मेढा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्याने इतिहास घडवला. आता वर्तमान काळामध्ये इतिहासाच्या जागी राजकारण शिरले आहे. सत्ता हाच पक्ष मानणारे अनेक जण असल्याने त्याचा जास्त लाभ सार्वजनिक कामांसाठी मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मेढा नगरीच्या विकासासाठी भरपूर निधी आणता येईल. पण, जनतेच्यासाठी ठराव करूनही शासकीय जागा मिळेना. याबाबत पाठपुरावा करण्यास स्थानिक पातळीवर यश येत नसल्याची खंत सामाजिक भान असलेल्या लोकांना अस्वस्थ करत आहे.
ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायत झाली. मात्र, आजही स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकली नाही. मेढा ग्रामपंचायत व त्यानंतर नगरपंचायत कारभाराबाबत वसंतराव करंदीकर, हौसाबाई मुकणे, अनिल शिंदे,मनीषा गुरव, राधिका करंजेकर, डॉ. संपतराव कांबळे, पांडुरंग जवळ, कांतीबाई देशमुख, बबनराव वारागडे, नारायण शिंगटे,दत्ता पवार व अन्य स्थानिक लोकप्रतिनिधींनी संधी मिळेल. तशी सार्वजनिक विकास कामे केली आहेत. मेढा नगरीचे संगिता वारागडे, कांतीभाई देशमुख,रूपाली वारागडे, बापूराव पार्टे, जयश्री कारंजकर यांनी जावळी पंचायत समिती मध्ये काम केले आहे. त्यांनी ही आपापल्या परीने विकास कामे केली
हे नाकारून चालणार नाही.
सध्या मेढा नगरीची व्याप्ती ही १७ प्रभागांमध्ये झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण काम करत आहेत .तरी मेढा नगरपंचायतीची कर वाढ , विकास आराखडा आणि आरोग्याचा प्रश्न याबाबत नेमकी भूमिका मांडून व तशा पद्धतीने ठराव मांडून सुद्धा काही प्रश्न उग्र स्वरूप धारण करत आहे. मुळातच मेढा नगरीतील जागेचा भाव गगनाला भिडला आहे . त्यामुळे रस्त्यावर बाजार भरावावा लागत आहे.
महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषदेच्या मालकी असलेल्या अनेक जागेची जुनी वास्तू व परिसर निरुपयोगी असून सुद्धा जागा अडवून ठेवली आहे. त्यामुळे साधी मुतारी बांधायचं म्हटलं तरी जागा शिल्लक नाही. कोणत्याही गावाचा विकास हा गावच्या मालकीच्या जागेच्या पुरवठ्यानुसार स्पष्ट पणाने दिसून येतो. आज शासकीय कार्यालय असलेल्या पंचायत समिती व तहसीलदार कार्यालय म्हणजे अनाधिकृत वाहन तळे म्हणूनच त्याचं उपयोग केला जातो. तर दुसऱ्या बाजूला तालुका न्यायालय, पंचायत समिती, पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामीण रुग्णालय या वास्तू जुन्या झाल्याने नवीन स्वरूपात त्याची उभारणी केलेली आहे. हा विकास असला तरी जुने मरण यातना भोगत आहे तर नव्याला अजून पालवी फुटेना. निकृष्ट दर्जाच्या बांधकामाने अनेक वास्तू ऑडिट करण्यापर्यंत पोहोचले आहेत.
मेढा नगरीत दिवसा आड पाणीपुरवठा होत आहे. साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या गावात सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ नसल्याने त्याचा उपयोग होत नाही. एखाद्या शहरातील आरोग्य हे शहराचा आरसा असतो. असा हा मेढा नगरीचा आरसा आहे. तालुक्याचे ठिकाण आहे .या भागात दररोज किमान सोमवार बाजार दिवशी हजार – पाचशे लोक नियमितपणाने येतात. मेढा ग्रामपंचायत अस्तित्वात असताना पावसाळ्यात घरटी मेडिक्लोर वाटप केले जात होते. आता दूषित पाणी घरोघरी दिसाआड येऊन सुद्धा लोक आवाज उठवत नाहीत. ठेकेदार जमात सांभाळण्यासाठी रस्ते- गटार झाले. असे विरोधक बोलत आहेत. त्यांचा आवाज शीण झाला आहे. त्यांच्या बाजूने बोलणारे कमी पण, सुदैवाने गप्प राहणारे जास्त झाले आहेत.
मेढा नगरीची शहराकडे वाटचाल सुरू आहे. चेहरा बदलला आहे. पण, ओळख पुसली गेली आहे. शासनाच्या मालकीच्या अनेक जागा गुंतून राहिलेले आहेत. या जागा जर मेढा नगरपंचायतीला वर्ग झाल्या तर मोठ्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करण्यास यश मिळणार आहे. पर्यटन वाढीसाठी ही चांगला मार्ग सापडणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर पाठपुरावा करणारे नेतृत्व नाही. पावावर अवलंबून राहणारा अमिबा हा कधीही स्वतः निर्मिती करत नाही. तशा पद्धतीने सत्तेचा पाव व त्यावरील अमिबा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नवीन पॅटर्न उदयास आलेला आहे. त्याला जावली तालुका अपवाद नाही. त्यामुळेच मेढा नगरीच्या विकासासाठी जागा देता का कोणी जागा? हे म्हणण्याची पाळी आली आहे. मेढा नगर पंचायत निवडणुका होतील. नगर सेवक, नगरसेविका निवडून येतील. पण, विकासाचे काय? याचे कधी तरी उत्तर द्यावे लागणार आहे. हे मात्र खरे…____________________________________फोटो– मेढा नगरीतील रस्त्यावर बाजार, तहसील कार्यालयात वाहन तळे (छाया-अजित जगताप, मेढा)
मेढा नगरीच्या विकासाला निधी,,, पण, जागा देईना कोणी????
RELATED ARTICLES
