ठाणे : कामगार-कष्टकऱ्यांचे विद्रोही कवी अशी सर्वमान्य ओळख असणाऱ्या, कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, ठाणे शहरातील विविध पक्ष आणि संघटनांतील समविचारी नेतेमंडळींनी एकत्र येत, ‘कविवर्य नारायण सुर्वे स्मृती जन्मशताब्दी समिती’ची स्थापना केली आहे. यासंदर्भातील एक बैठक नुकतीच ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या ठाणे कार्यालयात पार पडली. दि. १५ ऑक्टोबर-१९२६ साली जन्मलेल्या कविवर्य नारायण सुर्वे यांचे हे जन्मशताब्दी वर्षे असून, त्याचेच औचित्य साधून नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ठाणे शहरात, समाजिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या प्रतिभावंताचे कविसंमेलन आयोजित करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील पुरोगामी-साम्यवादी आणि डाव्या चळवळीतील समविचारी मंडळींनी एकत्र येऊन, कविवर्य नारायण सुर्वे यांनी, त्यांच्या कवितांमधून आणि लिखाणातून जो वैचारिक वारसा बहुजन-कष्टकरी समाजाला बहाल केलाय, त्याचाच प्रसार करण्यासाठी यापुढे ही समिती कार्यरत राहील, असे या बैठकीत ठरले. या कविसंमेलनात कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जीवनावरील लघुपट व त्यांच्या कवितांचे पोस्टर्स प्रकाशित करण्यात येणार आहे. दरम्यान, येत्या २ नोव्हेंबर-२०२५ रोजी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या ठाणे कार्यालयात ‘कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दी समिती’ची पुढील बैठक आयोजित करण्यात आली असून, त्याचवेळी कविसंमेलनाचा दिवस आणि ठिकाण निश्चित करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली. या बैठकीत सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या समविचारी मंडळींनी ९८६९०५५३६४, ९८२०८५५१०१, ९८६९१५१६५९, ९७६९२८७२३३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे, समाजवादी चळवळीतील नेते जगदीश खैरालिया, ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या नेत्या वंदना शिंदे, आंबेडकरी विचारांचा वारसा जपणारे ठाणे शहरातील ज्येष्ठ वकील नाना अहिरे, कामगार एकता परिषदेचे गिरीश भावे, डाव्या चळवळीतील कार्यकर्ते रवी जोशी, अविनाश कदम, उदय चौधरी, पत्रकार सुबोध शाक्यरत्न, ‘धर्मराज्य पक्षा’चे ऐरोली विधानसभा सचिव रत्नदीप कांबळे, कामगार प्रतिनिधी निरंजन म्हात्रे आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
ठाण्यात ‘कविवर्य नारायण सुर्वे स्मृती जन्मशताब्दी समिती’ची स्थापना
RELATED ARTICLES
