Wednesday, October 29, 2025
घरमहाराष्ट्रएसटीला दिवाळी हंगामात ३०१ कोटी रुपये उत्पन्न ---- परिवहन मंत्री प्रताप...

एसटीला दिवाळी हंगामात ३०१ कोटी रुपये उत्पन्न —- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (२९ आक्टोबर) यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला तब्बल ३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे. त्या खालोखाल जळगाव व नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो. चांगले उत्पन्न आणल्याबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
या वर्षी १८ आक्टोबर ते २७ आक्टोबर या दिवाळीच्या १० दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी ३० कोटी याप्रमाणे तब्बल *३०१ कोटी रुपये* उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे दिवाळी सुटीच्या परतीच्या दिवशी २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळवुन या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे.
एसटीच्या ३१ विभागात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने आणले असून (₹२० कोटी ४७ लाख) त्यानंतर जळगाव (₹१५कोटी ६० लाख) आणि नाशिक (₹१५ कोटी ४१ लाख ) विभागाचा क्रमांक लागतो. मागील वर्षीच्या दिवाळी हंगामाच्या पेक्षा यंदा महामंडळाने तब्बल ३७ कोटी रुपये उत्पन्न जास्त आणले आहे.

*चौकट:*

*सर्वसामान्य प्रवाशांची दिवाळी गोड करण्यासाठी घरापासून दूर राहून अहोरात्र कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी अभिनंदन केले आहे.*

*उत्पन्नाचे अपेक्षित लक्ष गाठण्यास एसटीला अपयश*

यंदाच्या आर्थिक वर्षांमध्ये एप्रिल व मे हे दोन महिने वगळता गेली चार महिने एसटी महामंडळाला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थिती यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महामंडळाला सुमारे १५० कोटी पेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला. परंतु ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा हंगाम व सुट्ट्यांच्या कालावधीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे प्रतिदिन ३४ कोटी रुपये याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात १०४९ कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले होते. तथापि, ऐन दिवाळीचे काही मोजके दिवस सोडता दैनंदिन लक्ष गाठणे महामंडळाला शक्य झाले नाही. पुणे, बीड, अहिल्या नगर अमरावती, बुलढाणा या विभागांनी मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीमध्ये चांगले उत्पन्न आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव यासारख्या विभागांनी मात्र अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळे महामंडळाच्या एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते.
निर्धारित केलेल्या लक्षात पेक्षा अत्यंत कमी उत्पन्न आणणाऱ्या विभागांच्या कामगिरी बाबत मंत्री सरनाईक यांनी चिंता व्यक्त केली असून सातत्याने तोट्यात राहणाऱ्या विभागांचे योग्य मूल्यमापन करून त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्यासाठी एसटी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments