नेरळ : दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात कोदिवले गावातील शेतकरी भाऊ विठ्ठल सोनावळे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. २१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजताच्या सुमारास अज्ञात मांस तस्करांच्या टोळीने त्यांच्या बैलाची चोरी करून निर्घृण कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
भाऊ सोनावळे दररोज आपल्या गुरांना चरायला नेत असत. त्या दिवशी बैल चुकल्याने ते उरलेली गुरे घेऊन घरी परतले. “तो नेहमीप्रमाणे परत येईल,” असा विचार करून ते निघाले, परंतु रात्रीच या निर्दयी भक्षकांनी त्यांचा बैल पकडून नदीकाठी नेऊन त्याची कत्तल करून मांस घेऊन फरार झाले.
गेल्या १५ ते २० दिवसांत परिसरात घडलेली ही दुसरी घटना असून ग्रामस्थांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीच्या कामासाठी अत्यावश्यक असलेला बैल गमावल्यामुळे सोनावळे यांच्यावर आर्थिक तसेच मानसिक संकट कोसळले आहे.
या घटनेनंतर गोरक्षक संघटना, शेतकरी बांधव आणि नागरिकांनी तात्काळ आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला असला तरी, नागरिकांचा संताप शमलेला नाही.
भाऊ सोनावळे यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, “हा फक्त माझा बैल नव्हता, तो माझा परिवाराचा सदस्य होता. अशा निर्दयी टोळ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, तेव्हाच शेतकऱ्यांना न्याय मिळेल.”
परिसरातील नागरिकांनीही सर्वांनी सतर्क राहून अशा घटनांवर अंकुश आणण्यासाठी चौकस राहण्याचे आवाहन केले आहे.