प्रतिनिधी : मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांग बांधवांना या दिवाळीत मोठा दिलासा मिळाला आहे. स्वतः दिव्यांग असलेले पत्रकार आणि मुंबई विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्री. दीपक कैतके यांनी मेट्रो रेल्वे मध्ये दिव्यांग बांधवांना सवलत देण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीकडे तत्काळ लक्ष देत नगरविकास खाते सांभाळणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने सुरू झालेल्या मेट्रो लाईन ३ (अक्वा लाईन) मध्येही दिव्यांग प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा देण्याचे मुंबई मेट्रो प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत.
आधीपासूनच मेट्रो 2A आणि मेट्रो 7 वर दिव्यांग बांधवांना सवलतीचा लाभ दिला जात आहे. आता अक्वा लाईनवरही हीच सवलत लागू होणार आहे. यामुळे दिव्यांग प्रवाशांना प्रवासात आर्थिक सवलतीसह मोठी सोय उपलब्ध होणार आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांना सर्व मेट्रो लाईनवर दिव्यांगांना तात्काळ सवलत देण्यासाठी सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारने संवेदनशीलतेने हा निर्णय घेतल्याने दिव्यांग प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या निर्णयामागे ज्येष्ठ पत्रकार आणि दिव्यांग बांधवांचे हितचिंतक दीपक कैतके तसेच आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा मोठ्या प्रमाणावर महत्त्वाचा ठरला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन दिव्यांग बांधवांना या दिवाळीत मेट्रो प्रवासात ‘सवलतीची दिवाळी भेट’ मिळाली आहे.
या निर्णयामुळे दिव्यांग व्यक्तींना रोजच्या प्रवासात दिलासा मिळेल आणि त्यांचा आत्मसन्मान वाढेल, अशी भावना दीपक कैतके व्यक्त केली आहे.