मुंबई : धारावी विधानसभा क्षेत्रात सध्या दिवाळी सणाचा उत्साह नाही, उलट सर्वत्र “कचऱ्याची दिवाळी” साजरी होत असल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण धारावी परिसरात रस्त्यांवर, गल्लीबोळांत, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे प्रचंड ढिगारे साचले असून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
महानगरपालिकेकडून आणि संबंधित एनजीओंकडून स्वच्छतेचे कामकाज नियमितपणे होणे अपेक्षित असताना, सध्या या दोघांकडूनच गंभीर दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. कामाचे ठेके, टेंडर आणि निधी उपलब्ध असतानाही साफसफाईचा ठसा दिसत नाही, हे विशेष धक्कादायक आहे.
धारावीतील नागरिक आणि स्थानिक पदाधिकारी यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “महापालिका अधिकारी व संबंधित एनजीओंची जबाबदारी निश्चित करून तातडीने धारावी कचरामुक्त करावी,” अशी मागणी केली आहे.
मराठी सण-उत्सवाच्या काळातच महानगरपालिका कर्मचारी संप पुकारतात, ही देखील चिंताजनक बाब आहे. परिणामी, सणासुदीच्या काळात मुंबईकरांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या विळख्यात सण साजरा करावा लागतो.
धारावी सारख्या आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होणे म्हणजे प्रशासनाची अपयशाची कबुलीच ठरते. स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांनी तातडीने पुढाकार घेऊन स्वच्छता मोहिम राबवावी, अशी सर्वसामान्य धारावीकरांची एकमुखी मागणी आहे.
🗣️ “कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नाही, स्वच्छतेच्या उजेडात दिवाळी साजरी करायची आहे,” असे ठामपणे नागरिक सांगत आहेत.
धारावी स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त करण्यासाठी नागरिक आता थेट कारवाईच्या तयारीत आहेत.