Monday, October 20, 2025
घरमहाराष्ट्रकुडाळ जि. प. गटात महिला उमेदवारांसाठी हालचाली सुरू...

कुडाळ जि. प. गटात महिला उमेदवारांसाठी हालचाली सुरू…

कुडाळ

(अजित जगताप) : जावळी तालुक्यातील मेढा यानंतर प्रमुख बाजारपेठ असलेल्या कुडाळ जिल्हा परिषद गटासाठी माहिती महायुती व महाविकास आघाडीमध्ये तसेच अपक्षांच्या इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नेत्यांच्या मर्जीनुसार ज्यांचे पान हालत नाही. त्यांना उमेदवारी देण्यापेक्षा नवीन चेहऱ्याला संधी देण्याच्या महायुतीमध्ये हालचाली सुरू झालेले आहेत. यामध्ये पदवीधर व सामाजिक कार्याचा अनुभव असणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील इतर मागासवर्गीय दाखले असलेल्या उमेदवारासाठी सक्रिय झालेले आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच जावळी तालुक्यातील आनेवाडी चे सुपुत्र जयसिंगअण्णा फरांदे यांना इतर मागासवर्गीय गटातून २७ वर्षांपूर्वी संधी मिळाली होती. त्यानंतर वाई तालुक्यातील हेमलता ननावरे या इतर मागासवर्गीय महिलांमधून अध्यक्ष झाल्या होत्या. त्याला काळ लोटला आहे. आता सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघात सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळाले नाही. सध्या इतर मागासवर्गीयांसाठी कोडोली ता. सातारा व कुडाळ ता. जावळी हे दोन जिल्हा परिषद गट इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत. ही सुवर्णसंधी ठरणार आहे. या ठिकाणी सक्षम व पदवीधर तसेच सर्व समाजाशी नाळ असणाऱ्या भाजप व पुरोगामी विचारांची नाळ असणाऱ्या महिलांना संधी मिळाली तर भविष्यात महायुतीला ताकद मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे सध्या भारतीय जनता पक्षाने गयाबाई आयाबाई पेक्षा पक्षासाठी योगदान देणारे तसेच मराठा क्रांती मोर्चा व इतर मागासवर्गीय चळवळीमध्ये सक्रिय योगदान असणाऱ्या महिलेला संधी द्यावी. अशी मानसिकता नेते व कार्यकर्त्यांची तयार झालेली आहे. मतदारही अशा महिलांना मतदान करतील असा एका सर्व्हे मध्ये अहवाल तयार केला आहे.
आज कुडाळ जिल्हा परिषद गटांमध्ये अनेक गुणवंत व सुशिक्षित महिला वर्ग सक्षमरित्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पद सांभाळू शकतात. समाजकारणासोबतच सामाजिक स्वास्थ राखणाऱ्या महिलेला संधी मिळाली तर खऱ्या अर्थाने सामाजिक सलोख्याची गोप विणली जाईल. अन्यथा विरोधालाही सामोरे जावे लागेल. याची कल्पना महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेले आहे. नवीन चेहऱ्याला संधी मिळाली तर कुडाळ जिल्हा परिषदे गटांमध्ये एक मत विरोधकाला… एक मत मला.. असा संधी साधू डाव करून विरोधकांनाही संधी देण्याचा प्रकार यापूर्वीही झालेला आहे. त्याचीही आठवण भाजप नेत्यांना करून दिली आहे.
कुडाळ जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे तात्कालीन दीपक साहेबराव पवार हे विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ऋषीकांत शिंदे, शिवसेनेचे शिवाजी जाधव व अपक्ष संजय गाडे यांच्या पराभवाला कारणीभूत असलेले त्या वेळचे संधीसाठी आजही भाजपसाठी पाय घड्या घालत आहेत. हाच कुडाळ भागात मोठा राजकीय विनोद आहे. त्याला खीळ घालण्यासाठी भाजप निष्ठावंत आणि महायुतीतील घटक पक्षांनीही आग्रह धरलेला आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या २०१७ च्या निवडणुकीत २७७ उमेदवार रिंगणात होते. जे जिल्हा परिषद सदस्य झाले. त्या हातावर मोजणे इतक्यात महिलांनी सभागृह गाजवले. विकास कामे केली तर काहीजण कायमची गायब झाली. आता ते पुन्हा एकदा उमेदवारीसाठी धडपड करू लागलेले आहेत.
जावळी तालुक्यातील कुडाळ, म्हसवे, कुसुंबी जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून माघारी घेणाऱ्यांसाठी तयार असणाऱ्या पळपुट्यांसाठीही सक्षम उमेदवाराचे दावेदार यांनी तरतूद केलेली आहे. त्याकडेही अनेकांचे लक्ष आहे.
कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये आदरणीय माजी आमदार लालसिंगराव शिंदे, युवा नेते सौरभ शिंदे, भाजप तालुका अध्यक्ष संदीप परामणे, आ. शशिकांत शिंदे, माजी आ. सदाशिवभाऊ सपकाळ आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जावळीचे राजकीय करिष्मा करणारे वसंतराव ज्ञानदेव मानकुमरे , दीपक साहेबराव पवार, नाना पवार, सुरेश गायकवाड, अंकुश शिवणकर,संदीप पवार, प्रविण देशमाने, सुनिल फरांदे, समाधान गायकवाड, मुरलीधर शिंदे, राजेंद्र कदम यांना मानणारा मतदार आहे. त्यांचाही या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग राहणार आहे. सध्या महायुती सत्तेत असल्याने एकतर्फी निवडणूक होईल. असे वाटले होते. परंतु कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये इतर मागासवर्गीय आरक्षण लागल्यामुळे अनेक कर्तबगार महिला यांची नावे पुढे येत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी पदवीधर व सुशिक्षित महिला असणे म्हणजे जावळीच्या विकासासाठी तसेच मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याही कामकाजाला सहकार्य लाभणार आहे. या दृष्टीनेच नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे सोनगाव, सर्जापूर, खर्शी तर्फ कुडाळ, सायगाव, ओझरे, आनेवाडी, रायगाव , महिगाव ,कुडाळ परिसरात इतर मागासवर्गीय महिला उमेदवाराची चाचणी सुरू झाल्याची खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.

_____________________________

फोटो – सातारा जिल्हा परिषद इमारत

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments