Saturday, October 18, 2025
घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील विधीनाटये पुस्तकाचे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

महाराष्ट्रातील विधीनाटये पुस्तकाचे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई(खंडुराज गायकवाड) परंपरेने सुरू असलेल्या महाराष्ट्रातील विधीनाट्यांवर आधारित सांस्कृतिक कार्य संचालनालय प्रकाशित *महाराष्ट्रातील विधीनाट्ये* या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

यावेळी वित्त राज्यमंत्री ना. आशिष जयस्वाल, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक. बिभीषण चवरे, मुख्य पोस्ट मास्तर जनरल अमिताभ सिंह, सांस्कृतिक कार्य संचालनालय सह संचालक श्रीराम पांडे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका श्रीमती मिनल जोगळेकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित *वाद्यरंग* हा प्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सदर कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य मंत्री ना.शेलार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले असून या पुस्तकाचे लेखन लेखिका श्रीमती तेजस्विनी चव्हाण- आचरेकर यांनी केले आहे.

खरं तर महाराष्ट्रातील विधिनाट्य हा विषय खूप मोठा आहे. एक कुलधर्म कुलाचार म्हणून असलेली विधीनाट्ये आणि आदिवासी विधीनाट्ये अशी एकूण आठ विधीनाट्यांचा सविस्तर परामर्श या पुस्तकात लेखिका श्रीमती तेजस्विनी चव्हाण- आचरेकर यांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील इतर विधीनाट्यांचा परिचय एका प्रकरणात करून देण्यात आला आहे. ही विधीनाट्ये सादर कशी करतात, कधी करतात, कोणाकडे करण्याची आणि का करण्याची प्रथा आहे याचा सांगोपांग मजकूर एकत्र करून पुस्तक स्वरूपात मांडला गेला आहे. हे पुस्तक एकूण शंभर पानी असून या पुस्तकात विधीनाट्य म्हणजे काय? याविषयी विस्तृत एक प्रकरण करण्यात आले आहे. यात विधीनाट्य कधी, केव्हा, कुठे, का सादर केले जाते याबद्दल माहिती मिळते तर विधीनाट्य केवळ नाट्य प्रयोग नसून त्यात लोकसंस्कृतीच्या श्रद्धा, पारंपारिक कथांचे मिश्रण व गीत, नृत्य, नाट्य, वाद्य यांचा कसा अंतर्भाव झालेला असतो, याबद्दल विस्तृत विवेचन केले आहे. जागरण, गोंधळ, भराड, नमन खेळे यांसारख्या नामांकित विधीनाट्यंसोबतच मादळ, खम्म, बोहाडा, दंडार, डाकभक्ती, घांगळी भक्ती, कणसरी आख्यान, काजविधी सारख्या प्रचलित नसलेल्या मात्र समाजामध्ये अस्तित्वात असणाऱ्या विधीनाट्यांचा मागोवा घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील लोककलेचा क्षेत्रीय अभ्यास यामध्ये असून विधीनाट्ये ही त्या त्या लोककला जपणाऱ्या उपासकांकडून माहिती मिळवून व विधीनाट्यांचे प्रात्यक्षिक पाहून लिहिलेला प्रपंच या पुस्तकात सचित्र स्वरूपात मांडला गेला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments