मुंबई- एकीकडे महाराष्ट्रात पहिले दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन केले असताना व बेस्ट,रेल्वे, तसेच अन्य सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमधून दिव्यांग व्यक्तींना काहीतून सूट, सवलत दिली जात असताना मुंबई मेट्रो मध्ये मात्र प्रवास करतेवेळी सवलतींमधून वगळल्याने मुंबईतल्या सर्वच दिव्यांग व्यक्तींनी राज्य सरकारच्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त केला आहे.
समस्त दिव्यांग्यांची हिच चीड व संताप याची तातडीने दखल घेत ज्येष्ठ राजकीय पत्रकार,व आरोग्य दूत म्हणून गेली अनेक वर्षे याच क्षेत्रात कार्यरत असणारे दीपक कैतके यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात एक लेखी निवेदन देऊन मुंबई मेट्रो मधून कामानिमित्त प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना तिकीटात खास सवलत देण्याची विनंती केली आहे.
आधीच दररोजच्या प्रवासात दिव्यांग व्यक्तींना प्रचंड आर्थिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागते. सध्या फक्त मुंबईतली बेस्ट, व अन्य मनपाच्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनातूनही प्रवास करताना सूट देण्यात आलेली आहे. तीच सूट राज्य परिवहन महामंडळाच्या (एस टी) बस मधूनही प्रवास मोफत करण्याची सुविधा लागू आहे. तर लोकल रेल्वे व अन्य लांब पल्ल्याच्या रेल्वे तून ८० टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तींना ७५ टक्के तर त्याच्यासोबत असलेल्या मदतनीस ५० टक्के प्रवासातून सूट देण्यात आलेली आहे. त्यातही काही यापूर्वीच सुरू असलेल्या मेट्रोमधून प्रवास करण्यास सवलत असताना नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई मेट्रो ३ मार्गावर मात्र याच सवलतींचा अभाव असल्याने दिव्यांग प्रवाशांना मोठा अतिरिक्त खर्च, व मनःस्ताप सहन करावा लागत असल्याने दिव्यांग व्यक्ती राज्य सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
खरंतर तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्यनेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी मेट्रो ७ आणि २A मार्गावर २५ टक्के सवलत दिली होती. मात्र मेट्रो ३ वर अद्यापही कोणतीही सवलत योजना लागू केलेली नाही.यामुळे एकाच शहरात दिव्यांग प्रवाशांवर वाहतुकीचा अन्यायकारक भार पडत असल्याचे कैतके यांनी विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यांच्या निदर्शनास आणून दिले.
तसं पाहिलं असता तत्कालीन केंद्र सरकारने काही वर्षापूर्वी आरपीडब्लूडी कायदा २०१६ तसेच संयुक्त राष्ट्रांच्या UNCRPD करारानुसार दिव्यांग नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीत सवलत देणे ही शासनाची जबाबदारी राहील या करारावर सही केली होती. मात्र, मुंबई मेट्रो प्रशासन आणि राज्य सरकारकडून अद्याप ठोस धोरण आखण्यात आलेले नाही. परिणामी, प्रवास हा दिव्यांग प्रवाशांसाठी आर्थिकदृष्ट्या मोठे ओझे ठरत असल्याकडे कैतके यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आपल्या निवेदनात लक्ष वेधले आहे. त्यामुळे या सवलतीं साठी स्पष्ट धोरण आणि कार्यपद्धती जाहीर करावी, व तात्काळ विनाविलंब मुंबईच्या सर्वच मेट्रो प्रवासातून सवलतीं संदर्भात मेट्रो प्रशासनाला निर्देश देण्याची मागणीही कैतके यांनी आपल्या निवेदनात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार
मुख्यमंत्री कार्यालयाने या तक्रारीची तातडीने दखल घेतली असून, संबंधित विभागांना आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. कारण दिव्यांग प्रवाशांसाठी वाहतूक सुलभ करणे ही सुविधा नव्हे, तर त्यांचा मूलभूत हक्क आहे, यावर कैतके यांनी भर दिल्याचे दिसून येते.