प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत.या दौऱ्यानिमित्त त्यांनी धारावी बचाव आंदोलन या संघटनेच्या
शिष्टमंडळास भेट द्यावी, धारावीचाही दौरा करावा आणि या निमित्ताने धारावी झोपडपट्टीवासियांच्या व्यथा,वेदना जाणून घ्याव्यात अशी जोरदार मागणी धारावी बचाव आंदोलनाचे नेते माजी आमदार बाबुराव माने यांनी केली आहे.
धारावीच्या विकासाला धारावी बचाव आंदोलन या संघटनेचा विरोध नाही.पण सध्या जो एकतर्फीपणे धारावीचा विकास चालू आहे त्याला आमचा विरोध आहे,असे बाबुराव माने यांनी मोदी यांना ईमेलने पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. विकास धारावीचा कि अदानी कंपनीचा विकास, असा प्रश्न सध्या धारावीत चर्चेत आहे.कारण जेथे झोपडपट्टी तेथेच त्या झोपडपट्टीचा विकास असे राज्य शासनाचे वर्षांनुवर्षाचे धोरण आहे. अदानी कंपनीने धारावीतच धारावीचा विकास करावा.धारावीतच झोपडपट्टीवासियांना घरे बांधून द्यावीत. असे धोरण असतानाही अदानी कंपनीस मुलुंड डम्पिंग ग्राऊंड, देवनार डम्पिंग ग्राउंड व कुर्ला मदर डेअरी (ही जागा बाॅटॅनिकल गार्डनसाठी राखीव)आदी ठिकाणची सुमारे ९०० एकर जागा
त्यांना कशासाठी दिल्या असा सवाल माने यांनी केला आहे.जेथे झोपडपट्टी तेथेच विकास हे धोरण असतानाही धारावी बाहेर धारावीकरांचा विकास हे राज्य शासनाच्या धोरणात बसत नाही याकडे बाबुराव माने यांनी लक्ष वेधले आहे.तसेच सर्व पात्र-अपात्र लोकांना धारावीतच ५०० चौ.फु.ची घरे, दुकाने-गाळे द्या,धारावीतील ५ हजार लघुउद्योगांसाठी लघुउद्योग पार्क उभे करा,कुंभार,कोळी बांधवांना व्यवसाया प्रमाणे जागा द्या या मागण्या धारावी बचाव आंदोलन या संघटनेच्या आहेत.या मागण्या राज्य शासन आणि अदानी कंपनीने अजून मंजूर केलेल्या नाहीत.या मागण्यांबाबत मोदी यांनी आमच्या धारावी बचाव आंदोलन संघटनेशी चर्चा करावी यासाठी मोदी यांनी धारावीचा दौरा उद्या करावा किंवा मुंबईच राजभवनवर धारावी बचाव आंदोलन च्या शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलवावे,असेही माने यांनी म्हटलेले आहे.
९०० एकरवर इतर झोपडपट्ट्यां वसवणार काय?
जेथे झोपडपट्टी तेथेच विकास ही भूमिका राज्य सरकारची आहे.मग अदानी कंपनीस धारावी बाहेर ९०० एकर जमिन दिली.त्यावर मुंबईतील इतर झोपडपट्ट्यांसाठी घरे बांधणार काय याबाबत अदानी कंपनी काहीच स्पष्टीकरण देत नाही. याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश आपण पंतप्रधान म्हणून राज्य सरकारला द्यावेत असेही बाबुराव माने यांनी म्हटलेले आहे.