गोडोली(विजय जाधव) : वडूथ (ता. सातारा) प्रगतशील शेतकरी जयसिंग नांगरे आणि त्यांची सुविद्य पत्नी सौ. मनिषा नांगरे यांनी हेक्टरी ३१०.५४ मे. टन आडसाली ऊस उत्पादन घेऊन विक्रमी उच्चांक प्रस्थापित केला. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शेंद्रे यांच्या कार्यक्षेत्रातील या विक्रमी उत्पादनाबद्दल नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते नांगरे दाम्पत्यांचा सन्मानचिन्ह आणि ८ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.
सन २०२४-२५ मध्ये घेतलेले हे उत्पादन नांगरे यांच्याच पूर्वीच्या एकरी ११० टन उत्पादनाच्या विक्रमाला मागे टाकणारे ठरले. शेतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करणारे नांगरे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून ऊस, हळद, आले व इतर पिकांवर यशस्वी शेती करत आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी ३० गुंठ्यात ३५ गाड्या आले काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांची आई श्रीमती सुभद्रा , वडील रामचंद्र हे हळदीचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी असून ती परंपरा आजही त्यांनी पुढे चालवली आहे.
उच्चांकी ऊस उत्पादनाचे रहस्य सांगताना जयसिंग नांगरे म्हणाले की ,” नांगरटी नंतर पुरेसे शेणखत, वेळेवर रासायनिक खतांचा मर्यादित वापर, वेळेत पाणी, बाळ भरणी, फवारण्या, दोन वेळा पाचट काढून त्याचे कंपोस्ट खत तयार करणे या शिस्तबद्ध मशागतीमुळे कोणतीही अडचण न येता एकरी ११० टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन शक्य होते. मजुरांवर अवलंबून राहू नये, शेतकरी स्वतः मेहनत घेतली तर शेतीत चांगला फायदा मिळतो. आंतर पिकामुळे घरखर्च, मजूरी निघून थोडी बचतही होते. मात्र यासाठी व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
या यशाबद्दल रमेश साबळे, संजय इथापे, सुभाष साबळे, संतोष जगताप, हरि पाटील, हणमंत, कोंडीबा, नवनाथ, तुकानाना, गुंडेराव यांच्यासह ग्रामस्थांनी नांगरे दाम्पत्यांचे अभिनंदन केले.