मुंबई(भीमराव धूळप) : कराड दक्षिण मतदारसंघातील शेतकरी सध्या नैसर्गिक संकट, वन्य प्राण्यांचा प्रादुर्भाव व बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पावसाळा अकाली सुरू झाल्याने अनेकांना पेरण्या करता आल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्यांच्या पिकांचे कोळपणी व भांगलण व्यवस्थित न झाल्याने उत्पादन धोक्यात आले आहे. उगवलेले थोडेफार पीकही डुक्कर, वानर, मोर व साळींदर यांच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पीक येण्याआधीच तोटा झाला आहे.याबाबत मंत्रालय पत्रकार भीमराव धूळप, घोगाव ग्रामस्थ बाबासाहेब साळुंखे,चंद्रकांत शेवाळे यांनी डॉ अतुल भोसले बाबा यांना निवेदन दिले.
या गंभीर परिस्थितीवर आमदार डॉ. अतुल भोसले यांनी शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या असून, “लवकरच वनविभाग व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली जाईल. त्यात ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत,” असे आश्वासन दिले. शेतकरी बांधवांना आर्थिक मदत, पीकविमा व शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळावा यासाठी ते शासनदरबारी ठोस पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.