प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आत्मनिर्भर सशक्त भारताच्या दृष्टीने आजचा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आपली ओळख निर्माण केली आहे. औद्योगिक क्रांतीच्या नंतरचे हे सर्वात मोठे अभियान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने एक महासत्ता म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.
बीएसएनएल आता नफ्यात आले असून पुढे जात असल्याचा आनंद आहे. स्वदेशी ‘४जी‘ तंत्रज्ञान विकसित करून डिजिटल भारताकडे आपली वाटचाल सुरू आहे. बीएसएनएल पुढे जाण्यासाठी हे तंत्रज्ञान म्हणजे महत्वाचे पाऊल आहे. जे अमेरिकेला साध्य झाले नाही ते भारताने करून दाखविले आहे. ग्रामीण भागाला, ग्रामीण भागात शिक्षण, दूरस्थ आरोग्य सेवा (टेलिमिडेसिन), पर्यटन आदीला याचा फायदा होईल. बीएसएनएलची स्वदेशी ‘४जी‘ची यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल. या तंत्रज्ञानामुळे बीएसएनएलचा नवा प्रवास सुरू होत आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे जे साहाय्य लागेल ते महाराष्ट्र करेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भरतेचे स्वप्न बीएसएनएलच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. स्वदेशी ‘४जी‘ तंत्रज्ञान फक्त 22 महिन्यात विकसित करून भारताने जगात नवी ओळख निर्माण केली आहे. नेटवर्किंग, संरक्षण क्षेत्र, अवकाश विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात भारताची क्षमता जगासमोर येऊ लागली आहे. पुढील काळात आपण ‘५जी‘ आणि ‘६जी‘ कडे जाणार आहोत. या नेटवर्कच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी भागात जाणार असून 25 हजार ठिकाणी पोहोचणार आहोत. स्वतःचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात हरिंदर कुमार यांनी महाराष्ट्रात 9 हजार 30 टॉवर्सचे उद्घाटन होत असून त्यात डिजिटल भारत निधी ‘४जी‘ प्रकल्पांतर्गत 2 हजार 174 टॉवर्सचा समावेश आहे. राज्य शासनाने 2 हजार 751 टॉवर्ससाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली असून वीजेची व्यवस्था, टॉवर्सपर्यंत पोहोचण्याचा रस्त्यांचा अधिकार (राईट ऑफ वे) आदी सुविधांद्वारे सहकार्य केले आहे. आगामी काळात 930 अतिरिक्त टॉवर्सद्वारे जोडणी नसलेल्या गावांपर्यंत पोहणार असल्याची माहिती दिली.
यावेळी आमदार विजय शिवतारे, अमित गोरखे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, हेमंत रासने, बापू पठारे आदी उपस्थित होते.