मुंबई(रमेश औताडे) : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर बारा वर्षांनंतर पुन्हा विविध आरोप करून हेतुपुरस्सर बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांच्या कार्यावर पुस्तके लिहिणारे लेखक अशोकराव टाव्हरे यांनी केला आहे. भविष्यात गडकरी यांना पंतप्रधानपदाची संधी मिळू नये यासाठी हा खटाटोप होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गामुळे आज प्रवास सुखकर झाला आहे. परंतु त्यामागे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलेली द्रुतगती मार्गाची संकल्पना होती. शासन एवढा खर्च करू शकत नसल्याने गडकरींनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली. १५८५ कोटी रुपयांचे बाँड उभारून अवघ्या १६०० कोटी रुपयांत द्रुतगती महामार्ग उभारण्यात आला.
२०१३ मध्ये गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना दुसरी टर्म मिळू नये म्हणून त्यांच्यावर आरोप झाले होते. त्या काळी काँग्रेसचे सरकार राज्यात आणि केंद्रात सत्तेत होते. अनेक चौकशीनंतर गडकरींना क्लीनचिट मिळाली. महाराष्ट्रातून आजवर कुणी पंतप्रधान झालेले नाहीत. गडकरी यांची ती संधी नष्ट करण्यासाठीच हे आरोप घडवून आणले जात आहेत.