मुंबई : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे जागतिक श्रद्धास्थान असून ते आजही बौद्धांच्या ताब्यात नाही.महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट हे पूर्णपणे बौद्धांकडे असावे.त्यासाठी बिहार विधानसभेचा 1949 चा बी टी ऍक्ट रद्द झाला पाहिजे. महाबोधी महाविहार ट्रस्ट मध्ये सर्व सदस्य बौद्ध आणि चेअरमन सुद्धा बौद्ध असला पाहिजे.भगवान बुद्धांनी मानवजातीला ज्ञानाचा समतेचा विज्ञानवादी आदर्श जीवनमार्ग म्हणून बौद्ध धम्म दिला.अंधश्रद्धा पुनर्जन्म श्राद्ध पिंडदान या कर्मकांडाला भगवान बुद्धांनी विरोध केला. मात्र जिथे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या महाबोधी महाविहार परिसराला अंधश्रद्धेच्या कर्मकांडाने वेढले आहे.त्यातून महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी बौद्धांचा संघर्ष सुरू आहे.अभी नाही तो कभी नाही या निर्धाराने महाराष्टातील सर्व रिपब्लिकन गट; बौद्ध आंबेडकरी पक्ष संघटना आणि सर्व पक्षीय बौद्ध नेते आता एकत्र आले असून येत्या 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबईत भायखळा येथील जिजामाता उद्यान राणी बाग ते आझाद मैदान असा विराट मोर्चा महाबोधी महाविहार मुक्तीसाठी काढण्यात येणार आहे .
याबाबतची माहिती देण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती ची पत्रकार परिषद घेण्यात आली.या पत्रकार परिषदेस सर्व पक्षीय बौद्ध नेते त्यात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर; ज्येष्ठ साहित्यिक नेते अर्जुन डांगळे; रिपब्लिकन नेते नाना इंदिसे; रिपब्लिकन बहुजन नेते प्रा.सुरेश माने; ज्येष्ठ नेते तानसेन ननावरे; युथ रिपब्लिकन चे सागर संसारे; रिपब्लिकन खोब्रागडे गटाचे नेते सुनीलभाऊ निर्भावने; दलित पँथरचे सुरेश केदारे; शिवसेने चे राजू वाघमारे; रवी गरुड; बाळराजे शेळके; राकेश मोहिते तसेच या बैठकीचे सर्वांना निमंत्रण देऊन समन्वय साधणारे रिपाइं आठवले गटाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत सर्व बौध्द आंबेडकरी नेते पक्ष संघटनांच्या वतीने येत्या 14 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चात राज्यातील बौद्ध आंबेडकरी जनतेने लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती च्या वतीने करण्यात आले आहे.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी राज्यातील बौद्ध आंबेडकरी जनतेची विराट एकजूट उभी करण्यासाठी सर्व रिपब्लिकन गट; सर्व बौद्ध आंबेडकरी संघटना सर्व बौद्ध भिक्खू संघटना आणि सर्व पक्षीय बौद्ध नेत्यांना एकत्र आणण्यासाठी समाजाचे नेते म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला असून सर्व पक्ष संघटना नेत्यांच्या तीन संयुक्त बैठका या पूर्वी मुंबईत घेण्यात आल्या आहेत.सर्व मतभेद राजकारण बाजूला ठेवून बौद्ध म्हणून सर्वांनी एकत्र येण्याचे आणि बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती च्या बॅनर खाली बौद्धांची एकजूट दाखवण्याचे आवाहन y करण्यात आले आहे.
येत्या 14 ऑक्टोबर रोजी राज्यातील बौद्ध आंबेडकरी
जनतेची एकजूट महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी विराट मोर्चातून दिसेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.