Monday, September 15, 2025
घरआरोग्यविषयकएएमआर चा धोका रोखण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर जरा जपुनच करा : तज्ज्ञांचा इशारा

एएमआर चा धोका रोखण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर जरा जपुनच करा : तज्ज्ञांचा इशारा

मुंबई: क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीज सोसायटीने CIDSCON २०२५ या १५ व्या वार्षिक परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेच सहभागी तज्ञांनी अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) सारख्या स्थितीला तोंड देण्यासाठी प्रभावी मार्गाबाबत चर्चा केली. यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून नामांकित तज्ज्ञ सहभागी झाले होते. ज्यात डॉ. वसंत नागवेकर(सचिव, सीड्स), डॉ. जॉर्ज वर्गीस(संसर्गजन्य रोग तज्ज्ञ, सीएमसी, वेल्लोर), डॉ. राजीव सोमन(वैज्ञानिक अध्यक्ष, सीड्स आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ, ज्युपिटर हॉस्पिटल्स, मुंबई/पुणे), डॉ. परीक्षित प्रयाग(सह-सचिव, सीड्स), डॉ. अश्विनी तायडे(कोषाध्यक्ष, सीड्स), डॉ. आयशा सुनावाला(सहाय्यक अध्यक्ष, सीड्स) आणि डॉ. तनु सिंघल(आयोजन सचिव, सीड्स) डॉ. शैलेंद्र होडगर(सहाय्यक सचिव, आयडी सल्लागार, लीलावती),डॉ. व्ही. बालाजी(सीएमसी, वेल्लोर), डॉ. कामिनी वालिया(वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयसीएमआर) आणि डॉ. सुब्रमण्यम(उपाध्यक्ष, सीड्स) यांचा समावेश होता.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. कामिनी वालिया यांनी भारतातील एएमआरचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आणि गुंतागुंतीच्या संसर्गांवर उपचार करण्यासाठी, येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अँटी-इन्फेक्टिव्ह्ज आणि सुधारित एमबीबीएस अभ्यासक्रमाची गरज अधोरेखित केली.

सीएमसी वेल्लोर येथील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. जॉर्ज वर्गीस सांगतात की, संसर्ग नियंत्रणाच्या बाबतीत आपल्याला स्पष्टपणे बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. डॅाक्टरांनी लिहून दिलेली बहुतेक अँटीबायोटिक्स अनावश्यक असतात आणि ते दीर्घ कालावधी वापरणे गरजेचे नसते. या अँटीबायोटिक्सच्या सततच्या माऱ्यामुळे रुग्णांना अँटीबॅाडी प्रतिरोधक बनवतो. अँटीबायोटिक्सचा योग्य वापर अतिशय गरजेचे आहे .

मुंबई/पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल्समधील संसर्गजन्य रोग तज्ञ तसेच आणि सीड्सचे वैज्ञानिक अध्यक्ष डॉ. राजीव सोमण सांगतात की, मोठ्या आणि लहान रुग्णालयांमध्ये एएमआरवर विविध उपक्रमांतर्गत चर्चा केली पाहिजे. हात धुण्यासारख्या संसर्ग नियंत्रण पद्धतींचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. सामान्य लोकांनी डॉक्टर आणि फार्मासिस्टला अँटीबायोटिक्स लिहून देण्याचा आग्रह करु नये. भारतात एएमआर उच्च पातळीवर आहे आणि रुग्णाला संसर्गासाठी मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते तेव्हा ते आधीच प्रतिरोधक असल्याने उपचारांमघ्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यामुळे उपचार करणे कठीण होते.

सीड्सचे सचिव डॉ. वसंत नागवेकर सांगतात की, तिसऱ्या पिढीतील सेप्सिसला प्रतिकार करण्याच्या सुमारे ६०% ते ७०% टक्के क्षमता भारतात आढळते. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये एएमआर दिसून येतो आणि आपल्या देशासाठी प्रमुख चिंता म्हणजे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर). एएमआरशी लढण्यासाठी, आपल्याला अँटीबायोटिक स्टुअर्डशिप प्रोग्रामची आवश्यकता आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्षयरोग (टीबी), जी अजूनही एक मोठी आरोग्य समस्या आहे. डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस सारख्या संसर्गांवर देखील दरवर्षी उपचार करणे कठीण होत आहे, ज्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक संसर्गाचे वेगवेगळे अँटीबायोटिक्स आणि वेगवेगळे उपचार असतात. जिथे अँटीबायोटिक्सची आवश्यकता असते, तिथे प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांचा वापर केला पाहिजे.

एएमआरशी लढण्यासाठी वैद्यकीय प्रणाली अपग्रेड करावी लागेल असे मत व्यक्त करत चेन्नईचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. सुब्रमण्यम सांगतात की, एएमआर ही एक गुंतागुंतीची समस्या आहे जी एका उपचाराने सोडवता येत नाही आणि त्यासाठी बहुआयामी दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. संसर्गाशी संबंधित मृत्यू दर कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग हा केवळ अँटीबायोटिक्स किंवा लसीकरण नाही; तर ती स्वच्छता आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. भारतातील वैद्यकीय प्रणाली अपग्रेड करण्याची ही योग्य वेळ असून शासनाने आता वैद्यकीय अभ्यासक्रमात संसर्ग नियंत्रणाचे धडे देणे गरजेचे आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पुढील पिढीने हे शिकणे खुप महत्त्वाचे आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये, मानसोपचारतज्ज्ञ असो वा न्यूरोसर्जन, प्रत्येकाला संसर्ग नियंत्रण आणि अँटीबायोटिक प्रतिकाराची मूलभूत माहिती शिकावी लागते.

वेल्लोर येथील सीएमसीचे डॉ. व्ही. बालाजी सांगतात की, रुग्णालयात रुग्णाची सुरक्षा महत्त्वाची आहे. जर एखाद्या रुग्णाला मधुमेहाने रुग्णालयात दाखल केले गेले आणि त्याऐवजी रुग्णालयातून मिळालेल्या संसर्गामुळे सेप्सिस झाला तर मात्र उपचारांमधील आव्हान वाढते. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांसाठी रुग्णालय इनक्यूबेटरसारखे काम करू शकते, ज्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते. रुग्णालयातून मिळालेले संसर्ग अशा प्रकारे पसरुन गुंतागुंत निर्माण करू शकते.

योग्य दृष्टिकोनावर भर देताना, आयसीएमआरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कामिनी वालिया म्हणाल्या, निदानापेक्षाही अँटीबायोटिक्स स्वस्त असल्याने, डॉक्टर अनेकदा योग्य निदान नियमांचे पालन न करता ते लिहून देतात. यासाठी अँटीबायोटिक्स वापराबद्दल नागरिकांना आणि डॉक्टरांना देखील अधिक शिक्षण, जागरूकतेची आवश्यकता आहे. बऱ्याचजा रुग्ण मोठ्या शस्त्रक्रियेतून बरे होतात, पण नंतर संसर्गामुळे मृत्युमुखी पडतात. ही एक अतिशय गंभीर बाब आहे.

तज्ज्ञांनी स्पष्ट केले की एएमआर आता जगातील सर्वात मोठ्या आरोग्य समस्यांपैकी एक ठरत आहे. जर यावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर २०५० पर्यंत दरवर्षी सुमारे १ कोटी लोकांचा यामुळे मृत्यू होऊ शकतो. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रतिजैविक औषधांचा अतिरेक व त्यांचा चुकीचा वापर असणार आहे

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments