सातारा(अजित जगताप ) : नैसर्गिक वरदान लाभलेल्या कास पठार परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात व्यावसायिक मार्केटिंग सुरू आहे. त्यामध्ये आता दरवर्षी हिल मॅरेथॉन स्पर्धा गाजत आहे. हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा लय भारी…. पण, रोजगार बुडला म्हणून रडतोय बिगारी…. असे दरवर्षी परिस्थिती पाहण्यास मिळते. याबाबत स्थानिकांनीच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसरातील यवतेश्वर ,सांबरवाडी, जांभुळवाडी जांभूळमुरे, अनावळे, पेट्री अंबानी, कसानी, देवकल, पारंबे,
अटाळी ,कास, कासानी ,वांजळवाडी, बामनुरी परिसरातील शेतकरी व दूध उत्पादक सकाळी दूध घेऊन सातारा शहराकडे येतात. परंतु, हाफ हिल मॅरेथॉन मुळे सकाळी सहा ते साडेदहा वाजेपर्यंत ग्रामीण भागाशी जोडणारा रस्ता स्थानिक पोलीस दलाच्या आदेशाने बंद करण्यात येतो. त्यामुळे या भागातून सातारा शहरात रतीब म्हणून दूध लवकर आणण्यास अडथळा येतो. वाहतूक बंद झाल्यामुळे स्थानिकांना विशेषता औद्योगिक वसाहत व बिगारी म्हणून काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगार बुडतो. आजारी माणसांना तर हाल सहन करावी लागतात. या बाबत आता स्थानिक नागरिक यशवंत साळुंखे यांच्यासह अनेकांनी आवाज उठवला आहे.
यापूर्वी सातारा जिल्ह्यात कर्तव्यदक्षतेने अधिकारी म्हणून काम केलेले अरुण भाटिया, अनिल डिग्गीकर, एम रामास्वामी, एम एम प्रसन्ना, डॉ. श्रावण बनसोडे, श्याम देशपांडे, के. श्रीकांत अशा अनेक मातब्बर अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले होते. हाफ किंवा फुल मॅरेथॉन मध्ये सक्रिय सहभागी न होता जनतेचे काम करण्यासाठी धावत होते. आता शासकीय यंत्रणा हाताशी धरून व्यवसाय वाढीची नवीन मॅरेथॉन योजना साताऱ्यात कार्यरत झाली आहे. पूर्वी प्रामाणिक लोकांचा सहभाग असल्यामुळे आपल्या खेळाडूंचे कौतुक होत होते. आता त्याला व्यावसायिक स्वरूप आले आहे.
सातारा शहर व परिसरात रस्त्यात खड्डे पडले तरी कधीही आंदोलन न करणारे आता चमकोगिरी स्पर्धा निमित्ताने धावणार आहेत .त्यांच्यासाठी पैसा ले लो.. चूपचाप टी शर्ट पेहने के भागो..असे गणित सोडविले आहे. यातील काही प्रामाणिक सुद्धा आहेत. त्यांच्या बद्दल स्थानिक भूमिपुत्रांनाही आदर आहे. पण, कुणाची मागणी व आंदोलन केले जात नसताना शासकीय पातळीवर पायघड्या घातल्या जात आहे.
साताऱ्यातील रस्ते व शाहू स्टेडियमचे वाटोळे झाले तरी लक्ष न देणारे आता व्यावसायिक व पंचतारांकित खेळाडू चांगलेच तयारीला लागले आहेत. ज्यांचा रोजगार बुडाला त्या बिगारी कुटुंबांची एक दिवस सक्तीची उपासमारी होणार आहे. दरवर्षी शासकीय कृपेने मॅरेथॉन जत्रा भरते.
रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी देशभरातून तब्बल आठ हजार धावपटूंनी नोंदणी केली आहे. सातारा परिसरातील वगळता काही स्पर्धक हे या भागात वास्तव्य करतात. स्थानिक प्रश्नाबाबत जनजागृती करतात. वेळेप्रसंगी आंदोलनही करतात. आपत्तीच्या वेळेला तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करतात. त्यांचे निश्चितच स्वागत आहे. अशी माहिती स्थनिकांनी दिली. व्यावसायिक ग्रुपच्या माध्यमातून कोणतीही सामाजिक प्रश्न न सोडवता धावणे. आमिष दाखवून स्वतःचे स्वतःनेच कौतुक करून घेण्याचाच प्रकार आहे. अशी टीका स्थानिक शेतकरी व कामगार वर्गंकडून होऊ लागलेली आहे. दरम्यान, संयोजकांनी स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला तर आमचा कधीही अशा मॅरेथॉन स्पर्धेला विरोध राहणार नाही असाही मतप्रवाह निर्माण झाला आहे.
—— ——- ——- ——– —– ———
. फोटो — सातारा येथे होणाऱ्या अशा कोट्यावधीची आर्थिक उलाढाल स्थानिकांसाठी एक रुपया नाही.