मुंबई : राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत महापालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, कोकण विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल, उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष कार्याधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती सादर केली. यात एकूण मतदारसंख्या, मतदारयादी विभाजन, प्रस्तावित मतदान केंद्रांचे वर्गीकरण, आवश्यक मतदान यंत्रांची उपलब्धता व साठवणूक व्यवस्था, मतदान साहित्य, तसेच मतदान केंद्रांवरील सोयी-सुविधांचा समावेश होता.
या तयारीबाबत समाधान व्यक्त करताना निवडणूक आयुक्त वाघमारे म्हणाले की, मुंबई महापालिकेने केलेली निवडणूकपूर्व तयारी परिपूर्ण आहे. मात्र मतदान केंद्रांवरील सुविधा वाढवून त्याची प्रभावी जनजागृती करावी, जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल. मागील निवडणुकीत आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी अधिक सक्षम उपाययोजना राबवण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
“मतदान प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक होण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत. सर्व अधिकारी-कर्मचारी निर्भय व पारदर्शकपणे कामकाज करावं. विविध यंत्रणांमध्ये योग्य समन्वय राखून निवडणुकीचं काम प्रभावीरीत्या पार पाडलं जावं,” असे निर्देश वाघमारे यांनी यावेळी दिले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घडामोडींना आता वेग आला आहे.