प्रतिनिधी : रस्त्यांवर, उघड्यांवर तयार केलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावे, तसेच शिळे अन्न देखील खाणे टाळावे, कारण उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. उघड्यावरील व निकृष्ट दर्जाचे पदार्थ खाल्ल्याने अन्न विषबाधेच्या घटना घडतात, ही बाब लक्षात घेता सर्व नागरिकांनी कृपया योग्य ती काळजी घ्यावी, मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे विनम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मुंबईतील नागरिकांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने विविध धोरणे, योजना आणि अभियान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नियमितपणे राबविण्यात येतात. ऋतूनिहाय आजारांची जनजागृती आणि उपाययोजना याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून नियमितपणे पाठवण्यात येते. सध्या उन्हाळ्यामुळे वाढलेले तापमान व त्यातून अन्न पदार्थांवर होणारे परिणाम आणि अलीकडे घडलेल्या अन्न विषबाधेच्या घटनेच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य प्रशासनाकडून मुंबईतील नागरिकांना आवाहन करणाऱया मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. नागरिकांकडून त्याबाबत सहकार्य अपेक्षित आहे.
मुंबईतील जवळपास १ कोटी ३० लाख लोकसंख्येला बृहन्मुंबई महानगरपालिका विविध नागरी सेवा-सुविधा पुरवत असते. मुंबईसारख्या धावपळीच्या महानगरात काहीवेळा रस्त्यावरील खाद्यपदार्थ स्वस्त किंवा सहजपणे उपलब्ध असल्यामुळे त्याचे सेवन केले जाते. असे असले तरी सार्वजनिक ठिकाणांवर उपलब्ध असणाऱया खाद्यपदार्थांबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
अनेकदा रस्त्यांवरील / उघड्यांवरील खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे, बरेचदा शिळे व योग्य पध्दतीने साठवलेले नसल्याचे निदर्शनास येते. त्यातही उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. खराब / निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे अन्न विषबाधा सारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. नुकतेच महानगरपालिका क्षेत्रातील पी उत्तर आणि एम पूर्व विभागामध्ये उघड्यावरील खाद्यपदार्थातून अन्न विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाप्रकारच्या अन्न विषबाधेमुळे जीवावर बेतू शकते, ही बाब लक्षात घेत नागरिकांनी याबाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, –
● बाहेरील व रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांकडून पेय आणि खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे.
● शक्यतो घरात शिजवलेले, ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. शिजवलेले अन्न झाकून ठेवावे. शिळे अन्न खाणेदेखील टाळावे.
● चिकन, मटण व मासे यासारख्या पदार्थांचे सेवन करण्यआधी ते ताजे, स्वच्छ व व्यवस्थित शिजलेले आहेत, याची खात्री करुन घ्यावी.
● लहान मुले रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन करणार नाहीत, याबाबतीत पालकांनी दक्षता घ्यावी.
● गर्भवती महिलांनी प्रामुख्याने दुसऱ्या तिमाहीमध्ये वैयक्तिक स्वच्छता व पौष्टिक आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.
● हिरव्या भाजीपाला आणि फळे यांचे सेवन नेहमी स्वच्छ पाण्याने धुतल्या नंतर करावे.
● प्रसाधनानंतर व स्वयंपाकापूर्वी हात नियमितपणे स्वच्छ धुवावे आणि वैयक्तिक स्वछता पाळावी.
● उलटी, जुलाब, मळमळ व कावीळ सारखी लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या महानगरपालिका दवाखाने तथा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.