Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणच्या सभेसाठी बैठक संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणच्या सभेसाठी बैठक संपन्न

प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १५ मे रोजी कल्याण येथे जाहीर सभा होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १२ मे रोजी कळवा येथे जाहीर सभा होणार आहे. या दोन्ही सभांच्या नियोजनासाठी आज महायुतीची बैठक डोंबिवली येथे संपन्न झाली. या बैठकीला महायुतीच्या घटकपक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या १५ मे रोजी कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज, व्हर्टेक्स मैदानावर जाहीर सभा होणार आहे. कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी ही सभा होणार असून या सभेच्या तयारीसाठी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. मोदीजींच्या सभेला जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नागरिक यावेत, यासाठी महायुतीच्या सर्वच पक्षांकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे १२ मे रोजी कळव्याच्या खारेगाव येथील ९० फुटी रस्त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांसाठी होत असलेल्या या सभेचीही महायुतीच्या सर्वच पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

या दोन्ही सभांच्या अनुषंगाने महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आज डोंबिवली येथे महत्वपूर्ण नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनसेचे आमदार राजू पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष अर्जुन नायर यांच्यासह महायुतीतील घटक पक्ष आणि मित्र पक्षांचे सर्वच प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कल्याण लोकसभेत मागील काही दिवसात प्रचार करत असताना लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून सगळीकडे जिवंतपणा अनुभवायला मिळत आहे. त्यामुळेच या दोन्ही सभांनाही मोठा प्रतिसाद मिळेल, आणि कल्याण लोकसभेची जागा विक्रमी मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments