कराड,मलकापूर(प्रताप भणगे) : नगरपरिषद कचरा गाडी चालक विश्राम हणमत येडगे व त्यांचे सहकारी जनार्दन कराळे यांनी आज प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
कचरा गोळा करून डेपोवर नेण्याच्या कामात असताना त्यांना कचऱ्यात तीन तोळ्यांची अंगठी सापडली. त्याच कचऱ्यात मिळालेल्या चिठ्ठीवरून मालकाचा पत्ता शोधून अंगठी ही अजय कुंभार यांची असल्याचे समजले. तत्काळ संपर्क साधून कर्मचाऱ्यांनी अंगठी सुरक्षितरित्या त्यांच्या मालकाकडे परत केली.
आजच्या काळात लाखो रुपयांची वस्तू सापडूनही ती मालकाला परत देणे हे मोठे धाडस व प्रामाणिकपणाचे द्योतक आहे. या कामामुळे मलकापूर शहरातील नगरपरिषद कर्मचारीवर्गाचा आणि शहरवासीयांचा अभिमान उंचावला आहे.
सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगण यांनी या प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, “विश्राम येडगे आणि जनार्दन कराळे यांनी केलेले कार्य हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा,” असे मत व्यक्त केले.