मुंबई(रमेश औताडे) : शालेय विद्यार्थ्यांना जीवन शिक्षणाचे धडे देणारी देशातील अग्रगण्य सामाजिक संस्था संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी एका अनोख्या कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त आणि शिक्षणतज्ञ मोहन सालेकर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रतिष्ठानच्या प्रांत संयोजिका नम्रता पुंडे विभाग संयोजिका सुचित्रा परब आदी मान्यवर उपस्थित होते. सोलकर म्हणाले, आज अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती अमली पदार्थांचे सेवन वडीलधाऱ्यांबद्दल अनादर मनाची चंचलता उग्रता आणि सहनशीलतेचा अभाव दिसत आहे.
आज अल्पवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे,त्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शासनाला आणि शाळांना याबाबत पावले उचलण्याच्या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत.
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देताना संयोजिका नम्रता पुंडे म्हणाल्या की,गेल्या २२ वर्षांपासून प्रतिष्ठान शालेय विद्यार्थ्यांना भारतीय जीवन मूल्यांचे शिक्षण देत आहे.
प्रतिष्ठानचा जीवन शिक्षण प्रकल्प देशातील २३ राज्यांमध्ये कार्यरत आहे.यावर्षी महाराष्ट्रातील १४०० शाळांमधील एक लाख ५० हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत आणि अलीकडेच गोवा सरकारने त्यांच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे .अशाच प्रकारच्या कार्यशाळा चेंबूर,ठाणे,घाटकोपर ,नवी मुंबई ,डोंबिवली ,कर्जत, रत्नागिरी गोमंतक आदी ठिकाणी संपन्न होत आहेत. कार्यक्रमाचे संचालन मानसी शिंदे यांनी तर आभार जयश्री चुरी यांनी मानले.