पुणे(सदानंद खोपकर) : कोथरूड येथील भुसारी कॉलनी परिसरात श्रावण महिन्याच्या निमित्ताने आयोजित ‘श्रावणबहार गीत आणि मंगळागौर’ कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळागौरचे महत्त्व सांगितले. त्या म्हणाल्या की, मंगळागौर हा केवळ स्त्रियांच्या मनोरंजनाचा खेळ नसून, तो भक्ती, सामाजिक एकोपा आणि स्त्रीशक्तीचे दर्शन घडवणारे एक आध्यात्मिक माध्यम आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ. मीनल निलेश धनवटे आणि निलेश धनवटे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी श्रावण महिन्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. मंगळागौरच्या खेळांतून स्त्रिया एकमेकांशी नातेसंबंध दृढ करतात आणि आपली सांस्कृतिक परंपरा जपतात, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. गोऱ्हे यांनी पुढे म्हटले की, या परंपरा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत आणि त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. या खेळांमध्ये शारीरिक चपळता, गाणी, फुगड्या, उखाणे आणि समूहभावना यांचा सुंदर संगम दिसून येतो.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कोथरूडमधील महिलांचे डॉ. गोऱ्हे यांनी कौतुक केले. रविवार असूनही वेळात वेळ काढून हिंदू धर्म आणि संस्कृती जपण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी महिलांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे, युवासेना सरचिटणीस अनिकेत जवळकर, शिवसेना शहरप्रमुख (महिला आघाडी) श्रद्धा शिंदे,नितीन पवार उपशहर प्रमुख आणि सुप्रिया पाटेकर महिला आघाडी उपशहर प्रमुख यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. शेवटी, सौ. श्रद्धा शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.