प्रतिनिधी : दि. १३ मे २०२५च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना संदर्भात सर्वसमावेशक सूचना देण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक ६ कर्मचाऱ्यांच्या चारित्र्य पडताळणीच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही मधील ६.१ चा संदर्भ देऊन मुंबईतील शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांनी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चारित्र्य पडताळणी करून चारित्र्य प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश सर्व शाळांना दिले आहेत. त्यामुळे सर्व शिक्षक /शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी प्रधान सचिव यांना पत्र लिहून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चारीत्र्य प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती रद्द करणेबाबत मागणी केली आहे.
मुद्दा क्र. ६ नुसार नवीन नेमणूक करताना अथवा बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करताना चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे करणे आवश्यक आहे. पण सर्वच कायम पदावर कार्यरत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सक्ती करणे उचित ठरणार नाही. शिक्षण निरीक्षक कार्यालयाने सर्वांना चारित्र्य प्रमाणपत्र देण्याची सक्ती केल्यामुळे असंतोषाचे वातावरण पसरले आहे. अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्तीच्या जवळ असून 25 ते 30 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली आहे. अशा प्रकारे
कायम पदावर कार्यरत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सक्ती करणे म्हणजे आम्हां शिक्षकांवर अविश्वास दाखवण्याचा प्रकार आहे, असे मत सुभाष मोरे यांनी व्यक्त केले.