Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रमुंबई, ठाणे, नवी मुंबईलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ -         प्रधान सचिव डॉ....

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ –         प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे

मुंबई, दि. १ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी, लेखन आणि विचारांतून समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना आत्मभान दिले. त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करून आपण समाजात समतेचे, शिक्षणाचे आणि स्वावलंबनाचे मूल्य रुजवावे. त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक कार्य हे आजही समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती महोत्सवनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल, अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (आर्टी) व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे, उपसचिव वर्षा देशमुख, उपसचिव रवींद्र गोरवे, आर्टीच्या निबंधक इंदिरा आस्वार उपस्थित होते.

डॉ. कांबळे म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती जपण्यासाठी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे शासनामार्फत भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. शिक्षण व स्वावलंबनाला प्राधान्य देत अण्णा भाऊ साठे यांच्या प्रबोधनात्मक विचारांचे प्रसारकार्य प्रत्येकाने आपल्या जीवनातून घडवावे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक जागरूक नागरिकाचीही आहे. या योजनांचा लाभ घेत प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा विकास साधावा आणि समाजाच्या समृद्धीसाठी योगदान द्यावे. शासन शिक्षण व उद्योजकतेवर विशेष भर देत असून, लवकरच विभागामार्फत नवीन व्यावसायिक योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. वारे म्हणाले, अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (आर्टी) वतीने राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम समाजातील पात्र उमेदवारांसाठी जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्टार्ट-अप, रोजगार निर्मिती योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

श्री. सांगळे म्हणाले, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना तसेच अनुदान योजना राबविल्या जातात. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनाही उपलब्ध करून दिल्या जातात. तरुण-तरुणींना विविध प्रकारची कौशल्ये मिळावीत, यासाठी महामंडळामार्फत कौशल्य विकास केंद्रे स्थापन केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती धनादेश वितरण तसेच यु.पी.एस.सी.,एम.पी.एस.सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व लाभार्थ्यांना सुविधा कर्ज धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पार्श्वगायक नंदेश उमप आणि त्यांचे सहकारी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम चंदोरकर यांनी केले तर आभार निबंधक इंदिरा आस्वार यांनी मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments