महाबळेश्वर(पांडुरंग चिकणे) : संत रोहिदास समाज फाऊंडेशन( महाराष्ट्र राज्य )संयुक्त वतीने महाबळेश्वर तालुक्याचे नवनियुक्त तहसीलदार सचिन म्हस्के यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन औपचारिक सत्कार करण्यात आला. स्थानिक पातळीवरील विकास योजनांचा आढावा घेणे, नागरी सुविधांचा अभाव दूर करणे, आणि प्रशासनाशी थेट संवाद साधणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
सत्कार समारंभावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. संपत धोंडिबा कदम आणि सदस्य श्री. राजाराम लक्ष्मण कदम, श्री. शंकर देवजी कारंडे, पांडुरंग राघू कारंडे, अजित बजरंग कारंडे, जितेंद्र तानाजी कारंडे, सदाशिव राघू कारंडे, मंगेश विठ्ठल कारंडे, सचिन तानाजी कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर फाऊंडेशनच्या वतीने तहसीलदार श्री. सचिन म्हस्के यांना गावाच्या विविध समस्यांवर आधारित सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या: स्थानिक रस्त्यांची दुरवस्था आणि दुरुस्तीची आवश्यकता, पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा,वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा,ग्रामपंचायतीकडून होणारे दुर्लक्ष, प्राथमिक आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या सुविधा पुरविण्याची गरज या विषयांवर तहसीलदार साहेबांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर सचिन म्हस्के यांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, तसेच संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.
या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, प्रशासकीय पातळीवर असा थेट संवाद साधण्याचा आणि प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न अत्यंत स्वागतार्ह ठरला आहे. संत रोहिदास समाज फाऊंडेशनच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत असून, यामुळे स्थानिक विकासाला निश्चितच गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.