मुंबई, १७ जुलै २०२५ — पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संघटनेतर्फे आज आजाद मैदानात एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. पोलीस कुटुंबीयांच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन करण्यात आले असून, शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलक महिलांनी केली.
या आंदोलनातील मुख्य मागण्या दोन आहेत:
१. मुंबईत वास्तव्यास असलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासकीय दरात मालकी हक्काने घरे द्यावीत.
२. निवृत्त पोलिसांच्या शासकीय निवासस्थानावरील दंडनीय अनुज्ञप्ती शुल्कात झालेली लक्षणीय वाढ तातडीने मागे घेऊन पूर्वीचे दर लागू करावेत.
पोलीस पत्नी एकता मंच गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस कुटुंबीयांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडत आहे. “पोलीस कर्मचारी अहोरात्र सेवा देतात, पण निवृत्तीनंतर त्यांच्यावर आर्थिक अन्याय होतो, ही शोकांतिका थांबवावी,” अशी भावना अध्यक्ष जान्हवी भगत यांनी व्यक्त केली.
संस्थेने स्पष्ट केले की, या मागण्या पूर्ण झाल्यास पोलीस कुटुंबीयांना सन्मानाने जीवन जगता येईल. “सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी कळकळीची विनंती आंदोलनात करण्यात आली.