प्रतिनिधी :मानपाडा पोलिसांनी निळजे परिसरात केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल ₹२ कोटी १२ लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त करत दक्षिण आफ्रिकन तस्कराला अटक केली. अवघ्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा अशा प्रकारचा मोठा साठा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तरुणाईच्या भवितव्याला सुरुंग लावणाऱ्या या घातक पदार्थांचा बीमोड करण्याचा पोलिसांचा निर्धार निश्चितच स्तुत्य आहे.
या धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ कामगिरीचे माजी आमदार तथा मनसे नेते राजू पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे खास कौतुक करत “मानपाडा पोलिसांच्या सतर्कतेला सलाम!” अशा शब्दांत अभिनंदन केले आहे.
पोलिसांच्या तत्परतेमुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असून, स्थानिक पातळीवर अशा प्रकारच्या कारवायांमुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होत आहे.