Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रडॉ.जे.के.बसू सेंद्रिय शेती पुरस्काराने प्रदीप शेलार यांचा सन्मान

डॉ.जे.के.बसू सेंद्रिय शेती पुरस्काराने प्रदीप शेलार यांचा सन्मान

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील कोयनानगर (सोनारवाडी) येथील युवा शेतकरी प्रदीप कोंडीबा शेलार यांचा डॉ.जे.के.बसू सेंद्रिय शेती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पाटण तालुक्यात सेंद्रीय शेतीचा पुरस्कार मिळवणारे ते पहिले युवा शेतकरी ठरले आहेत. पुरस्कार वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद पवार, आत्माचे अजय शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

सेंद्रीय शेती, फुले, फळे व दुग्धक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे पुरस्कारांचे वितरण कृषी दिनी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यादिवशी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध पुरस्कार देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेले नवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नैसर्गिक सेंद्रिय शेतीतील योगदान व शाश्वत शेती पद्धतीला प्रोत्साहन देणे हा या पुरस्कारामागचा उद्देश आहे.
पुरस्कार सोहळयात बोलताना याशनी नागराजन म्हणाल्या, प्रत्येक कुटुंबातील एकाने शेतीचे शिक्षण घेऊन, आधुनिक पद्धतीने शेती करावी. फलोत्पादन, दुग्धोत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. समूह शेतीला प्राधान्य देणे, उत्पादित मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. शेती क्षेत्रातील बदलांचे अनुकरण केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल. युवकांनी आपल्या शिक्षणाचा शेतीमध्ये उपयोग करावा. पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे, ही बाब प्रेरणादायी अशी आहे. भाग्यश्री फरांदे म्हणाल्या, कृषी विभाग शेतकर्यांसाठी कष्ट घेत आहे. मात्र, 50 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी फार्मर आयडी काढत नाहीत, ही शोकांतिका आहे.
प्रदीप शेलार यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले आहेत. उन्हाळयामध्ये ते मिरची, भेंडी, कारली, काकडी, दुधी भोपळा, घेवडा, दोडका, स्ट्रॉबेरी, भुईमूग इ.पिके घेत असतात. जुन्या पारंपारिक बियाण्यांचा वापर करून देशी गाईचे शेणखत, जीवामृत, दशपर्णी अर्क व ताक इ.वापर करुन सेंद्रीय पध्दतीने उच्च गुणवत्तेचे भात उत्पादन घेवून त्याची 100 ते 120 रुपये किलो या दराने थेट ग्राहकांना तांदळाची विक्री केली जाते.
मिनी महाबळेश्वर असं वातावरण असणाऱ्या कोयनानगर या ठिकाणी सेंद्रिय स्ट्रॉबेरी लागवडीचा अनोखा उपक्रम प्रदीप शेलार यांनी यशस्वीपणे राबवला आहे. स्ट्रॉबेरीसाठी गांडूळखत वर्मी वॉश, जीवामृत, दशपर्णी अर्क तसेच अच्छादनासाठी प्लास्टिक न वापरता भात्यानाचा वापर केला. हे सर्व करून 1 गुंठ्यामध्ये 1 दिवसाला 1 किलो पेक्षा जास्त उत्कृष्ट प्रतीची स्ट्रॉबेरी मिळू लागली. पाटण तालुक्यातील ग्राहकांबरोबरच मुंबईच्या ग्राहकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला व 400 ते 600 रुपये प्रति किलो या दराने विक्री केली आहे.
सेंद्रिय शेतीसाठी लागणारी खते, औषधे त्यामध्ये घनजीवामृत, गांडूळखत, जीवामृत, बिजामृत, निमास्त्र, अग्नि अस्त्र आणि दशपर्णी अर्क निर्मिती केली. नैसर्गिक आच्छादन, चिकट सापळे, फोरमन ट्रॅप, पक्षी तांबे यांच्या वापरामुळे किड नियंत्रण करून जमिनीची सुपीकता वाढवण्यात यशस्वी ठरले आहेत.
देशी गाईच्या आहारामध्ये रोज अश्वगंधा, शतावरी अशा विविध प्रकारचे चूर्ण वापरले जाते त्यामुळे शेण, गोमूत्र आणि दुधाची क्वालिटी उत्तम प्रकारची येते. देशी गाईच्या शेण, गोमूत्र आणि दुध यांच्यापासून पंचगव्य निर्मिती करून साबण, धूप कांड्या, गोवऱ्या, फिनाईल, मालिश तेल, केस तेल असे विविध प्रकारचे प्रॉडक्ट तयार केले जातात तसेच देशी गायीच्या दुधापासून तूप निर्मिती करून 5000 रुपये प्रति किलो या दराने विक्री होते. या सर्व प्रॉडक्टची विक्री थेट ग्राहकांना केली जाते. त्यांच्या या प्रयोगशील शेतीची दखल घेवून प्रदीप शेलार यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे डॉ.जे.के.बसू सेंद्रिय शेती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. माहिती कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी प्रास्ताविक केले.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments