दिल्ली पासून गल्लीपर्यंत जो उठतो तो सकाळी उद्धव ठाकरे दुपारी आदित्य ठाकरे संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि रात्र पडली तरी आदित्य ठाकरे ! अरे, सरकार चालवताय नां ? मग जनतेसाठी, लोकांसाठी, लोकहितासाठी, देशहितासाठी, राज्य हितासाठी काही तरी करा नां. उठसूठ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, ठाकरेंच्या शिवसेनेवर दुगाण्या झाडण्याचं अव्याहत काम सुरु आहे. वरचा बोलला की खालचाही त्याच्या दुप्पट आवाजात ठाकरेंवर दुगाण्या झाडण्याचं काम करुन आपली निष्ठा दाखविण्याचे कार्य करीत असतो. समर्थाघरचे श्वान म्हटले तर त्या बिचाऱ्या प्रामाणिक श्वानाचा अपमान. जे जे बडबडताहेत ते ते सारे मातोश्रीचे लाभार्थी आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. २००२ साली गोध्रा येथे झालेल्या रामसेवकांवरच्या जळित कांडा नंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदी यांना राजधर्म म्हणून हटविण्याची तयारी केली होती. परंतु हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या मार्फत अटलबिहारी वाजपेयी यांना सुस्पष्ट शब्दांत सांगितले होते की, मोदी को हात मत लगाओ. मोदी गया तो समझो गुजरातसे बीजेपी गया. बाळासाहेब ठाकरे यांनी नीक्षून सांगितलेला सल्ला अटलबिहारी वाजपेयी यांनी ऐकला आणि मोदी गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर राहिले ते थेट २०१३ पर्यंत. मग भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि ते २६ मे २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान बनले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेचा पाठिंबा दिला होता. २४ सप्टेंबर २०१४ रोजी पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे एकनाथ खडसे यांनी शिवसेनेबरोबर पंचवीस वर्षे जुनी युती तोडण्याची घोषणा केली. (हे त्यांनीच स्पष्ट केले आहे). शिवसेना भाजप आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढले. २०१४ च्या १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात भाजपला १२३, शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. शरद पवारांच्या अदृश्य हाताने अल्पमतातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार वाचविले. परंतु आपली खुर्ची पाच वर्षे शाबूत राहण्यासाठी देवेंद्रांनी धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत दादा पाटील यांना मातोश्रीवर पाठविले. १२३ जागा असलेल्या भाजपला ६३ जागा पटकावणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थन दिले. १२ नोव्हेंबर २०१४ पासून विरोधीपक्षनेते असलेल्या एकनाथ शिंदे यांना ५ डिसेंबर २०१४ च्या संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या मुळे मंत्रीपदाची लॉटरी लागली. तिथपासून देवेंद्र एकनाथांचा समृद्धी महामार्ग सुरु झाला. उद्धव ठाकरे यांच्या मुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षं टिकले. या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने मातोश्री चे लाभार्थी ठरले. अर्थात भाजपचे केंद्र आणि राज्य सरकार मधील सारेच ठाकरे कुटुंबाचे लाभार्थी म्हणावे लागतील. मग त्यात वरपासून खालपर्यंत सगळेच आले. कुणा कुणाची नांवे घेणार ? बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक दगडांना शेंदूर फासून लाल दिव्याच्या गाड्या मिळवून दिल्या पण ज्या ज्या दगडांना शेंदूर फासला ते ते सगळे स्वतः ला देव समजू लागले. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आपण सत्तेवर येऊ शकलो, मंत्री बनू शकलो ही साधी पुसटशी जाणीव सुद्धा जे ठेवू शकत नाहीत ते मातोश्रीवर दुगाण्या झाडण्याचं पाप करताहेत. बेताल, बाष्कळ बडबड करताहेत. कुणी नकली औलाद म्हणतो तर कुणी नकली सेना, शिल्लक सेना म्हणतो तर कुणी थेट रश्मी ठाकरे यांना या दळभद्री, गलिच्छ राजकारणात ओढण्याचे महापाप करण्यास धजावतो. कुणी लॅंड स्कॅम चा बादशहा असल्याचा आरोप करुन प्रसिद्धी मिळण्याचा खटाटोप करतोय. मातोश्री आणि शिवसेना भवन तसेच सद्गुरु दर्शन येथे मानाचे पान स्वीकारणाऱ्या नतद्रष्टांची दुसऱ्या पक्षात जाऊन नवनेतृत्वाची शाबासकीची थाप मिळण्यासाठी अहमहमिका लागली आहे. ज्या ज्या नेत्याचे नाव घ्याल तो या ना त्या कारणाने मातोश्रीचाच लाभार्थी ठरला आहे. ज्याची पात्रता नाही, ज्यांचे वयही नाही ती मंडळी सत्तेची झूल पांघरताच पोपटासारखी पटपट बोलून मातोश्रीवर घाणेरडे आरोप करताहेत. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केल्याशिवाय टीआरपी वाढत नाही. त्यामुळे असले अश्लाघ्य, घाणेरडे आरोप करताहेत. ज्यांनी मातोश्रीचा उंबरठा पाहिला नाही, ते बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याची भाषा करताहेत आणि ज्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना पाहिले नाही ते धर्मवीरांचे गोडवे गाताहेत. एका अर्थाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना ‘अच्छे दिन ‘ आले असेच म्हणावे लागेल. आज हे दोन्ही महान नेते असते तर अशा बेताल बडबड करणाऱ्यांची आपापल्या पद्धतीने ‘खबर’ घेतली असती. २०१४ पासून आजवरची एकेकांची मुक्ताफळे उधळणाऱ्यांची कींव करावीशी वाटते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागलेल्या कुटंबांप्रती सहानुभूती दाखविण्याऐवजी जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांबद्दल बोलतांना, आपल्या नेत्यांची पराकोटीची चमचेगिरी करतांना आपण या सधन कुटुंबियांची थट्टा उडवीत आहोत याचेही भान बेताल बडबड करणाऱ्यांना राहिलेले नाही. आपण कोण आहोत, कुठून इथवर कसे आलो याची जाणीव सुद्धा या बेताल मुक्ताफळे उधळणाऱ्यांना नाही, याचेच वैषम्य वाटते. साम दाम दंड भेद या सर्वच प्रकारांचा वापर करून सत्ता मिळाली असा आरोप ज्यांच्यावर होतोय अशा मातोश्रीच्या लाभार्थ्यांनी मातोश्रीच्या उपकाराची जाणीव ठेवण्याऐवजी कृतघ्न होऊन अशा प्रकारे परतफेड करावी याचेच दुःख वाटते. अशा या बेताल बडबड करणाऱ्यांना इतिहास माफ करणार नाही.
– योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१ (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)