ठाणे : शिवसेना ठाणे जिल्ह्याचे खासदार आणि प्रवक्ते मा. नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत आनंदमठ, ठाणे येथील मध्यवर्ती कार्यालयात पर्यावरण विषयक थेट संवाद आयोजित करण्यात आला. या बैठकीत शिवसेनेचे उपाध्यक्ष श्री. मनोज शिंदे यांच्या पुढाकारातून आणि सरचिटणीस श्री. पांडुरंग पाटील यांच्या समन्वयातून मुंबई व ठाणे महानगर क्षेत्रातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली.
या संवाद बैठकीसाठी पर्यावरण संवर्धनात कार्यरत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने विशेष समिती स्थापन करून प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेत लोकसहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला. या चर्चेसाठी पर्यावरण क्षेत्रातील अभ्यासक व सेवानिवृत्त मनपा अधिकारी श्री. तानाजी घाग यांची नियुक्ती करण्यात आली होती.
चर्चेदरम्यान ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणीय पडझड, स्वच्छता, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व जतन, धूर-धूळ व ध्वनी प्रदूषण, नद्या-नाले प्रदूषण यांसारख्या विषयांवर सखोल विचारमंथन झाले. नागरिकांच्या सहभागातून पर्यावरण जनजागृती वाढवणे आणि शासकीय योजना प्रभावीपणे राबवून त्यातून स्थानिक स्तरावर रोजगार निर्माण करण्यासाठी बचत गट आणि सामाजिक संस्थांना सक्रिय करण्यात यावे, यावर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीत तयार झालेला ठोस प्रस्ताव शिवसेना सरचिटणीस पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. खासदार श्री. म्हस्के यांनीही या पर्यावरणविषयक उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दर्शवित, भविष्यातील निर्णय प्रक्रियेसाठी सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिले.
ही बैठक पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली असून लोकसहभागाच्या माध्यमातून ठाणे व मुंबईच्या पर्यावरण रक्षणासाठी नव्याने दिशा ठरवणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.