ताज्या बातम्या

लावणी कलावंत महासंघाच्या ११ व्या वर्धापनदिन सोहळ्यात लावणी गौरव पुरस्कारांचे वितरण….. सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची उपस्थितीत घोषणा – “कलाकारांसाठी गोड बातमी लवकरच”

ुंबई : लावणी कलावंत महासंघ – मुंबई या संस्थेचा ११ वा वर्धापनदिन व पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी दादरच्या श्री शिवाजी मंदिर येथे मोठ्या जल्लोषात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, स्थानिक आमदार महेश सावंत, महाराष्ट्र बाजार पेठचे संस्थापक संचालक डॉ. कौतिक दांडगे, शिवसेनेचे वरळी विधानसभा प्रमुख दत्ता नरवणकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमात लावणी कलाकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन महासंघाचे संस्थापक संतोष लिंबोरे पाटील व अध्यक्षा कविता घडशी यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांच्याकडे सादर केले. यासंदर्भात बोलताना मंत्री शेलार यांनी, “कलाकारांसाठी एक गोड बातमी लवकरच जाहीर केली जाईल,” असे आश्वासन दिले.

कार्यक्रमात अनेक मान्यवर कलाकारांना गौरवण्यात आले. ज्येष्ठ शाहीर मधुकर खामकर यांना जीवनगौरव पुरस्कार, तर पुढील कलाकारांना लावणी गौरव २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले: लावण्यवती प्रज्ञा कोळी, शाहीर दत्ताराम म्हात्रे, गायिका वंदना निकाळे यांच्यासह पुरुष लावणी कलाकार आनंद साटम निर्माते उदय साटम ,वादक धीरज गोरेगावकर, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निवेदक भरत उतेकर, लोककला कार्यकर्ते सुनिल ढगे, नेपथ्य तंत्रज्ञ सुनील देवळेकर तसेच, किरण डांगे आणि सुजाता कांबळे-डांगे या लावणी कलाकार दांपत्याला राजाराणी २०२५ पुरस्काराने गौरवण्यात आले.

या वेळी इयत्ता १०वी व १२वी मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या कलाकारांच्या मुलांना विशेष सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. तसेच महासंघाच्या नवरंग स्पर्धेतील विजेत्यांनाही सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता मुंबईतील नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या दमदार लावणी नृत्य व संगीत कार्यक्रमाने झाली. रसिकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याला हजेरी लावून कलाकारांचे उत्साह वाढविण्यात मोलाचे सहकार्य केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top