मुंबई(सदानंद खोपकर) : रायगड जिल्हा ,पोलादपूर तालुका समिती वतीने घाटकोपर (पूर्व) येथील झवेरीबेन हॉलमध्ये आयोजित तालुका स्नेहसंमेलनात छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, भाजप गटनेते आणि आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
राष्ट्रपती पदक विजेते वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, जलतरणपटू संग्राम निकम, डॉ.ओमकार कळंबे, गुहागरचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांचाही गौरव याप्रसंगी करण्यात आला.
छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, अरविंदनाथ महाराज, रायगड जिल्हा परिषद. चे उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, उद्योजक संजय कदम, शिवराम उतेकर, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे,कार्यक्रमाचे संयोजक सुभाष पावर, किशोर जाधव, अमोल वानखेडे यांसह मोठ्या संख्येने पोलादपूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छावा चित्रपटची निर्मिती करणे सोपे काम नव्हते. यापूर्वी लक्ष्मण उतेकर यांचे अनेक चित्रपट आले-गेले. परंतु छावा चित्रपटातील विषय संवेदनशील होता. या संवेदनशील विषयाला हात घालत छत्रपती संभाजी राजेंचे मोठेपण जगासमोर आणण्याचे काम आपल्या पोलादपूरच्या मातीतील उतेकर यांनी केले आहे. संपूर्ण जगाला लक्ष्मण उतेकर माहित झाले. नावं मिळवणे, कमावणे आणि टिकवणे अत्यंत महत्वाचे आहे , असे सांगून प्रविण दरेकर म्हणाले, हा केवळ सत्काराचा कार्यक्रम नाही. पोलादपूरच्या विकासाची अभियान सुरु करणारी चळवळ आहे.