प्रतिनिधी (प्रताप भणगे) : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुरू केलेलं उपोषण अखेर सातव्या दिवशी मागे घेतलं. उपोषण मागे घेतल्यानंतरही त्यांनी सरकारला नवी डेडलाईन दिली असून, येत्या २ ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीबाबत स्पष्ट निर्णय जाहीर न केल्यास मंत्रालयात घुसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, शुक्रवारी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा संवाद साधून दिला. त्यानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन कर्जमाफीसंदर्भात येत्या १५ दिवसांत उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल, असा अधिकृत पत्रासह संदेश दिला. याच समितीत बच्चू कडू यांचा समावेश असणार आहे.
बच्चू कडू म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटी मौन सोडलं आहे. आपण कर्जमाफीच्या मागणीवर ९० टक्के यश मिळवलं असून दिव्यांगांच्या २० मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र अंतिम निर्णयाची तारीख २ ऑक्टोबरपर्यंत सांगितली नाही, तर आम्ही मंत्रालयात प्रवेश करू.”
कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी लढा देणाऱ्या या उपोषणाला आता सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत मिळाले आहेत, पण प्रत्यक्षात कर्जमाफीची अंमलबजावणी होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.