ताज्या बातम्या

नवी मुंबईत कोविड रुग्ण नाहीत, पण नवी मुंबई महापालिका सज्ज

प्रतिनिधी : राज्यातील काही भागात सध्या कोविड रुग्ण आढळल्याच्या बातम्या येत आहेत. त्या अनुषंगाने काळजी म्हणून ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून आल्यास खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काही बाबींचे पालन करणे गरजेचे आहे. त्यानुसार ‘काय करावे’ व ‘काय करू नये’ याबाबत खालील सूचनांचे पालन करावे असे सूचित करण्यात येत आहे.

हे करावे :

* खोकला किंवा शिंक येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक हे रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे.

* साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत.

* ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे.

* भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक अन्न खावे.

* संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी.

कोविड सदृश्य लक्षणे असल्यास हे करू नये :

* हस्तांदोलन टाळावे,

* टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये.

* आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा.

* डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.

* सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

* डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेऊ नये.

नवी मुंबई महानगरपालिकेची नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये येथे सर्दी, खोकला अर्थात आयएलआय व सारी रुग्णांवर उपचार करण्यात येतो. सध्याचा कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागांतर्गत सर्व रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रे यांना व्हीसीव्दारे सूचना देण्यात आलेल्या आहेत.

त्यादृष्टीने खबरदारी घेत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आदेशानुसार महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली येथील सार्वजनिक रूग्णालयांमध्ये प्रत्येकी ०५ बेड्स राखीव ठेवण्यात आलेले आहेत. तसेच माँसाहेब मीनाताई ठाकरे सार्वजनिक रुग्णालय, नेरूळ येथे चाचणी लॅब देखील उपलब्ध आहे.

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनाही याबाबत सतर्क राहण्याच्या व कोविड सदृश्य लक्षणे आढळल्यास महानगरपालिकेस सूचित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासोबतच केंद्र व राज्य शासनामार्फत याबाबत वेळोवेळी प्राप्त होण्याऱ्या सूचनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येईल.

तरी नवी मुंबईकर नागरिकांनी कोविडबाबत घाबरून न जाता आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक दक्षता घेण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता नाहक भीतीचे वातावरण पसरवू नये. मात्र सर्दी, खोकला, फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळल्यास वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा तसेच वैद्यकिय सल्ला घ्यावा आणि आपल्या नजिकच्या नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top