प्रतिनिधी(रमेश औताडे) : बहुतेक सोशल मीडियावर हवामान संदर्भातील हवामान अंदाजाची माहिती देत असतात. मात्र ही माहिती अचूक नसते व त्याला कोणताही आधार नसतो. त्यामुळे अशा माहितीवर विश्वास ठेऊ नये असे मत प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मुंबई प्रेस क्लब व प्रादेशिक हवामान विभाग तसेच असर या संस्थेने यांच्या संयुक्त विद्यमाने उष्णतेच्या लाटा व हवामान बदल याबाबत परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी कांबळे बोलत होते.
वातावरण बदल व पर्यावरणाचा समतोल याबाबत जनतेत म्हणावी तेवढी जनजागृती नाही. आता एवढे उष्ण वातावरण आहे तरीही लोक पर्यावरणाबाबत गंभीर नाहीत. वातावरणातील बदलामुळे हवामान खात्याचे अंदाज काही वेळेस मागे पुढे होतात. मात्र समाज माध्यमावर ब्रेकिंग व टी आर पी च्या गोंधळात अचूक माहिती मिळत नाही. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो.
आय एम डी या संकेतस्थळावर अचूक माहिती अपडेट होत असते. मात्र वातावरण बदलामुळे काही अंशी माहिती बदलू शकते. शेतकरी व हवामान खाते यांचा अतूट संबंध असतो. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचे संकेतस्थळ महत्वाची भूमिका बजावत आहे.