प्रतिनिधी (रमेश औताडे) : आचारसंहितेच्या काळामध्ये बांधकाम कामगार विषयक कल्याणकारी सर्व कामे पूर्वीप्रमाणे सुरू राहिली नसल्याने कामगार नोंदणी , मुलांची शिष्यवृत्ती , कामगार मृत्यू झाला तर त्याला भरपाई अशा अनेक कल्याणकारी योजना बंद ठेवल्या आहेत. मात्र कंत्राटदाराचे बिल्डर चे भले करणाऱ्या योजना सुरू असल्याने आचारसंहितेच्या काळात कंत्राटदाराचे ” चांगभलं ” करणाऱ्या सरकारच्या विरोधात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांनी दिला आहे.
पूर्वीपासून चालत आलेल्या शासकिय योजना विषयक कामे सुरु आहेत ती बंद ठेवण्याची काही आवश्यकता नाही. बांधकाम कामगार मृत्यु पावला तर त्याची बिल्डरकडून ऑनलाईन नोंदणी होत नाही. काही कामगारांच्या विधवा पत्नी यांचे प्रश्न आहेत. मुलांची शिष्यवृत्ती योजना बंद आहे. असे अनेक प्रश्न घेऊन महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांना पुजारी यांनी निवेदन दिले आहे.
पूर्वीच्या सरकारने बांधकाम कामगारांना दिवाळीच्या वेळेस ५००० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतलेला होता त्याची अंमलबजावणी या सरकारने केलेली नाही. या सर्व अन्यायाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये संघटनेच्या वतीने रिट पिटीशन दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत येणाऱ्या चार दिवसांमध्ये बांधकाम कामगार विषयक ऑनलाईन कामे सुरू न झाल्यास बांधकाम कामगारांना आचार संहिता काळामध्ये मुंबईत उपोषण करणार असे पुजारी यांनी सांगितले.
कॉ शंकर पुजारी, सागर तायडे, विनिता बाळेकेंद्री, सुनील अहिरे, हुस्ना खान, रविकांत सोनवणे, रतीव पाटील, हे शिष्टमंडळ उपस्थित होते.