Saturday, August 23, 2025
घरमहाराष्ट्रवरिष्ठ नागरिकांची वाढती संख्या विचारात घेऊन वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आवश्यक :...

वरिष्ठ नागरिकांची वाढती संख्या विचारात घेऊन वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आवश्यक : राज्यपाल

प्रतिनिधी : आरोग्यसेवा क्षेत्रातील क्रांतिकारक बदल तसेच जीवनमानातील सुधारामुळे देशातील लोकांचे सरासरी आयुष्यमान वाढले असून सन २०५० पर्यंत भारतात साधारण ३४ कोटी वरिष्ठ नागरिक असतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अमेरिकेच्या लोकसंख्येइतके वरिष्ठ नागरिक एकट्या भारतात असतील. या दृष्टीने विचार नियोजन करून वरिष्ठ नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा निर्माण करणे तसेच अद्ययावत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते शनिवारी (दि. १८) मुंबईतील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टच्या ‘सुकून निलाय पॅलिएटिव्ह केअर सेंटर’च्या विस्तार प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

आज युवा असलेली व्यक्ती उद्या वरिष्ठ नागरिक होणार आहेत हे लक्षात घेऊन प्रत्येक युवा व्यक्तीने ज्येष्ठांची सेवा केल्यास उद्या स्वतःला गरज पडेल त्यावेळी इतर लोक आपली सेवा करतील असे राज्यपालांनी सांगितले.

किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्ट ही गरीब आणि निराधार व्यक्तींसाठी व रुग्णांसाठी उत्कृष्ट कार्य करीत असून दानशूर व्यक्तींनी संस्थेला मदत करावी. मात्र केवळ पैश्याने मदत करणे पुरेसे नसून लोकांनी आपला काही वेळ देखील सेवेसाठी द्यावा असे आवाहन राज्यपालांनी केले. यावेळी राज्यपालांनी संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ एरीक बार्जेस यांनी प्रास्ताविक केले.

ट्रस्टच्या आवारात कॅन्सर व्यतिरिक्त इतर गंभीर आजारांच्या रुग्णांना विनामूल्य सेवा देणाऱ्या इमारतीच्या छताच्या नविनीकरण प्रकल्पाचे आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कोनशिलेचे देखील राज्यपालांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. सुरुवातीला राज्यपालांनी पॅलिएटिव्ह केअर सेंटरला भेट दिली व रुग्णांची विचारपूस केली.

कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पालिकेच्या वैद्यकीय संचालक डॉ. निलम आंद्राडे, ट्रस्टचे विश्वस्त, देणगीदार संस्थांचे प्रतिनिधी आणि वैयक्तिक देणगीदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments