कराड : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणारे मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना या कक्षाची जबाबदारी दिली होती. या कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे.
या कक्षाच्या माध्यमातून लोकांच्या सेवेची नाळ जुळलेले मंगेश चिवटे हे लोकांच्या सेवेत व्यस्त आहेत. नुकतेच ते कराड (जि.सातारा) येथे प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. या कार्यक्रमात त्यांनी कोणत्याही रुग्णाचे उपचार पैशाअभावी थांबू नयेत यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची संकल्पना असल्याचे सांगितले. या माध्यमातून रुग्णसेवेचे ईश्वरीय कार्य होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेचा हा वसा जपणार असल्याचे त्यांनी सांगत लोकांना योजनेबाबत संपुर्ण माहिती दिली. याशिवाय कराड परिसरातील हाॅस्पिटलना भेटी देत योजनेचा लाभ तळागाळातील लोकांना भेटत आहे का नाही याचीही माहिती घेतली.
स्पंदन अवॉर्ड पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमादरम्यान मंगेश चिवटे यांनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टची माहिती माहितीपत्रके, घडी पत्रके, कर्तव्यमुद्रा बुकलेट, मासिक स्पंदन एक्सप्रेस विशेषांक इ.मधून घेतली. यातील माहिती वाचून तिचे अवलोकन करुन मंगेश चिवटे हे प्रभावित झाले. त्यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत ट्रस्टच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. केवळ शुभेच्छा देवून न थांबता त्यांनी ट्रस्टला रु.20 हजाराची देणगी जाहीर केली. यामुळे मंगेश चिवटे यांनी सामाजिक दातृत्वाचे स्पंदन जपल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने श्री.चिवटे यांना आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला.
यावेळी व्यासपीठावर तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थानाचे मठाधिपती डाॅ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज, पार्श्वगायिका कविता राम, मालिका दिग्दर्शक विठ्ठल डाकवे, अभिनेते पंकज काळे, राष्ट्रवादी काॅंग्रसे शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ.संगिता साळुंखे, पत्रकार गजानन तुपे, अभिनेत्री अंजली आकळे, शिवम असोसिटसचे गुलाब जाधव, ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, सौ.रेश्मा डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
रुग्णमित्र मंगेश चिवटे यांनी जपलेल्या या सामाजिक दातृत्वाचे कौतुक होत आहे.

फोटो ओळ : मंगेश चिवटे यांचे स्वागत करताना डाॅ.संदीप डाकवे