प्रतिनिधी : माझ्याकडून पक्ष, चिन्ह सर्वकाही काढलं, तरी तुमचे आशीर्वाद आई जगदंबेच्या रुपानं माझ्यासमोर उभे आहेत. भारतीताईंची निशाणी फक्त शिवसेनेची नाही, तर तुमच्या अन्यायाला जाळून टाकणारी ती धगधगती मशाल आहे. ही मशाल पालघरमध्ये जेव्हा मशाल पेटेल त्यावेळी पालघरवर अन्याय करणारे सत्ताधारी त्याच्यात जळून भस्म होतील, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. ते पालघरच्या शिवसेना ठाकरे गटाच्या पालघरच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
उद्धव ठाकरे मोदींवर टीका करताना म्हणाले, इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर गुजरातच्या हक्काचं आम्ही देऊच. पण महाराष्ट्राच्या हक्काचं आम्ही मोदींना ओरबडून देणार नाही. दहा वर्ष देशानं तुम्हाला संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्याऐवजी तुम्ही माती केली. जर का देश मजबूत पाहिजे असेल, तर सरकार संमिश्र पाहिजे. कारण एका पक्षाचं आणि एका व्यक्तीचं सरकार देशात हुकूमशाहाला जन्म देऊ शकतं. त्या सरकारला आत्ताच गाडून टाका.
ठाकरे पुढे म्हणाले, मित्रांच्या खिशात तुम्ही पालघर घालणार असाल, तर मित्रांचा खिसा फाडून आम्ही पालघरचा विकास करुन दाखवू. इतकी वर्ष झाली पण पालघरची पाणीटंचाई सोडवण्यासाठी आजपर्यंत एव्हढे खासदार झाले, त्यांनी लक्ष का दिलं नाही. पालघर जिल्हा तुम्ही वेगळा केला, पण या पालघर जिल्ह्याचं वैशिष्ट्य कायम ठेवून इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असे उद्योग इकडे का आणत नाहीत. पालघर जिल्हा पर्यटनसाठी उत्तम जिल्हा आहे. पालघरमध्ये मला विमानतळ आणायचं होतं. सर्व चांगले उद्योगधंदे गुजरातला न्यायचे. गद्दार गुजरातला न्यायचे. इकडे वाढवण बंदर करायचं. तिकडे बारसूत रिफायनरी. नाणारची रिफायनरी मीच रद्द केली होती.
जनतेचा विरोध असेल तर बारसूला सुद्धा रिफायनरी होणाक नाही, असं मी सांगितलं होतं. विध्वंस करणारे उद्योग महाराष्ट्राच्या माथी मारायचे आणि चांगेल उद्योग गुजरातला पळवायचे. मोदी तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाहीत, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. आमचं गुजरातशी वैर नाही. गुजरात सुद्धा आमचा आहे, असं मी अनेकदा म्हटलं. उद्या इंडिया आघाडीचं सरकार ३०० पार करून येणारचं. हे राज्यातलं नव्हे, देशाचं चित्र सांगतय.
ही निवडणूक नुसती वाढवणच्या बंदरासाठी नाही, तर पालघरच्या विकासासाठी आणि राज्याच्या हितासाठी आहे. मी एकदा बोलल्यावर पुन्हा मागे फिरत नाही. तुम्ही आपलं सरकार आणा, वाढवण बंदराचा विषय त्यांच्या कागदावरून मी पुसून टाकणार. ज्यावेळी तुम्ही आम्हाला मतं देता, ती नुसती मतं नसतात, ते तुमचे आशीर्वाद असतात, असंही ठाकरे म्हणाले.