Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमुंबई भेटीवर आलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्यपालांशी संवाद

मुंबई भेटीवर आलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्यपालांशी संवाद

प्रतिनिधी : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक युवतींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची शुक्रवारी (दि. २९) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. नेहरू युवा केंद्र संघटन संस्थेतर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

काश्मीर हा भारताचा सर्वात सुंदर प्रदेश आहे व जीवनात एकदा तरी काश्मीरला भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाला असते असे सांगून एम. जी. रामचंद्रन यांच्या तामिळ चित्रपटात आपणास काश्मीरचे दर्शन घडल्यापासून आपण काश्मीरला भेट देण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

परस्परांना समजून न घेतल्यास समस्या निर्माण होतात असे सांगून, एक दुसऱ्याच्या प्रदेशाला भेट दिल्यास आपण परस्परांना चांगले समजून घेऊ शकतो असे राज्यपालांनी सांगितले. या दृष्टीने काश्मीरच्या युवकांची महाराष्ट्र भेट परस्पर समंध दृढ करण्यास उपयुक्त ठरेल असे राज्यपालांनी सांगितले. काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग असून पुढे देखील ते राहील असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले. आपण सर्वांनी एक देश म्हणून राहिल्यास जगातील कोणतीही महाशक्ती आपल्याला आव्हान देऊ शकणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी श्रीनगर, अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम व पहलगाम या जिल्ह्यातील युवक युवतींनी राज्यपालांशी प्रश्नोत्तर रूपाने संवाद साधला. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनांचे राज्य संचालक प्रकाश मनुरे, जिल्हा युवक अधिकारी निशांत रौतेला व इतर उपस्थित होते. या भेटीनंतर काश्मिरी युवकांनी राजभवनातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments