प्रतिनिधी : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोस्त कला मंचच्या वतीने,हर सवाल का जवाब… बाबासाहब या संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार २ डिसेंबर रोजी संध्याकाळी ठीक ६ ते ९ या वेळेत दादर पश्चिम येथील दादर माटुंगा कल्चरल सेंटर इथे हा कार्यक्रम होत असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
हर सवाल का जवाब… बाबासाहब,या कार्यक्रमाची संकल्पना रवि भिलाणे यांची असून पुरोगामी,आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते कलावंत सामूहिकरित्या हा कार्यक्रम सादर करणार आहेत.या कार्यक्रमात शिव शाहू फुले आंबेडकरी विचारधारा मांडणारी विचारप्रवर्तक गीते,वर्तमान आणि भविष्याचा वेध घेणारी महामातांची मनोगते,बुद्ध कबीराची संगीत वाणी,उपेक्षित समाज घटकांची नाट्यमय अभिव्यक्ती,विद्रोही कविता, रॅप आदी कलाविष्कार यांचा समावेश आहे.हजारो स्क्रू वापरून बनवलेली बाबासाहेबांची प्रतिकृती विशेष आकर्षण असणार आहे.
दोस्त कला मंचच्या वतीने ज्योती बडेकर, राजा आदाटे,संजय शिंदे,भानुदास धुरी,काशिनाथ निकाळजे,अशोक विठ्ठल जाधव,सुनील साळवे,संदेश गायकवाड,राजू शिरधनकर,प्रशांत राणे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.प्रवेश सर्वांसाठी खुला असून लोकांनी आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रकांच्या वतीने करण्यात आले आहे.