मुंबई : महापालिका प्रशासन लोकसभा निवडणुकींच्या तयारीत गुंतले असल्याचा फायदा घेऊन मुंबई आणि उपनगरांत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. निवडणुकीचे कारण देत संबंधित अधिकारीही अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे टाळत आहेत, त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत.
भांडुप पश्चिम येथील गावदेवी रोड परिसरात मागील तीन दिवसांपासून अनधिकृत बांधकाम केले जात आहे. याबाबत जागामालक संजीव कुमार सदानंदन यांनी पालिकेच्या एस विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. मात्र पालिकेने सदरहू बांधकाम थांबविण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही.
कोकण नगर, भांडुप येथील दुर्गाप्रसाद दुबे चाळ संजीवकुमार सदानंदन यांच्या मालकीची आहे. तेथील एक भाडेकरू हरिलास सीताप्रसाद दुबे यांनी मालक अथवा महानगर पालिकेची कोणतीही परवानगी ना घेता, सदर जागेत बेकायदा बांधकाम सुरु केले. सदर जागेबाबत मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये जुना वाद आहे. त्यातही दुबे यांनी सदर जागा रिक्त करावी, असा निवडा लघुवाद न्यायालयाने २०१७ मध्येच दिला आहे. दुबे यांनी याविरोधात अपील केले असून, प्रकरण आजही न्यायालयात प्रलंबित आहे. अशा ठिकाणी कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय बांधकाम करणे, हा एकप्रकारे न्यायालयाचा अवमान आहे.
तरीही निवडणूक काळात पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष गृहीत धरून दुबे यांनी सादर जागेत पक्के बांधकाम सुरु केले. दुबे यांनी बांधकाम साहित्य आणल्यावर लगेच, संभाव्य धोका लक्षात घेऊन संजीव कुमार सदानंदन यांनी एक विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. तसेच भांडुप पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्याकडेही रीतसर तक्रार दिली. मात्र कुणालाही याची दाखल घेण्यास संवाद मिळाली नाही. संपूर्ण शहरातच अशाप्रकारे मोकळ्या जागा बळकावण्याचा प्रकार सुरु आहे. निवडणुकीचे निमित्त करून, प्रशासनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे, अशी हतबलता सदानंदन यांनी यावेळी व्यक्त केली.