मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत व्यापक प्रमाणात मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. स्वीप सेल, मुंबई शहर जिल्हा कार्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना, मुंबई विद्यापीठ तसेच लाला लजपतराय महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वोकॅथॉन
चे आयोजन करण्यात आले. या फेरीत तब्बल ११ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आज सकाळी दहा वाजता एअर इंडिया बिल्डिंग, मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यत ही फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये मार्क युवर प्रेझेन्स (MYP) या सामाजिक संस्थेसोबत मुंबई शहरातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी स्वीप
चे मुंबई शहराचे समन्वय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, राष्ट्रीय सेवा योजना मुंबई शहराच्या जिल्हा समन्वयिका क्रांती इंदूरकर तसेच मुंबई विद्यापीठाचे विशेष कार्य अधिकारी सुशील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मरीन लाईन्स पोलीस ठाण्याच्या सहकार्याने ही फेरी काढण्यात आली.
लोकशाहीच्या या उत्सवात मतदानाचे महत्त्व आणि युवावर्गाचा सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी या “वोकॅथॉन” चे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मानवी साखळी, पोस्टर डिझाईन व मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली.