प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक सुरू झाली आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी दणक्यात प्रचार सुरू केला आहे. आपल्या सारख्या लोकशाही देशात प्रत्येक नागरिकाचा कल हा कुठल्याना कुठल्या विचारधारेच्या बाजूने असतो. या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी वकील आणि न्यायाधीशांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ‘न्यायाधीश आणि वकिलांनी संविधानाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. न्यायाधीशांनी निःपक्षपाती असायला हवे’, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले.
नागपूर खंडपीठाच्या बार असोसिएशनच्या शतक महोत्सवी सोहळ्याला सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मार्गदर्शनही केले. ‘आपल्या सारख्या जीवंत आणि तर्कशुद्ध लोकशाहीत बहुतेक लोकांचा कल हा कुठल्या ना कुठल्या राजकीय विचारधारेच्या बाजूने असतो. मनुष्य हा एक राजनीतीक प्राणी, असे ॲरिस्टॉटलने म्हटले आहे. याला वकीलही अपवाद नाहीत. तरीही बार असोसिएशनच्या सदस्यांनी न्यायालय आणि संविधानाशी पक्षपात करू नये’, असेही सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.
न्यायपालिका आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि पक्षविरहित, कार्यकारी, कायदेमंडळ आणि निहित राजकीय हितसंबंधांपासून अधिकार वेगळे करण्यासाठी सतत पुढे आली आहे. न्यायपालिकेची स्वायत्तता आणि बारचे स्वातंत्र्य यांच्यात सखोल संबंध आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. एक संस्था म्हणून बारचे स्वातंत्र्य हे संविधान आणि कायद्याच्या शासनाच्या रक्षणासाठी ‘नैतिक कवच’ म्हणून काम करते’, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.
‘एकदा निकाल दिला की तो सार्वजनिक मालमत्ता होते. संस्था म्हणून आपली जबाबदारी ही खूप मोठी आहे. माध्यमांमधून, राजकीय भाष्यातून किंवा सोशल मीडियातून स्तुती आणि टीका होत असे. आणि आपण दोन्हीही स्वीकारतो’, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.