मुंबई (रमेश औताडे) : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासी ओबीसी मागासवर्गीयांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत भारताचे संविधान राहील आणि संविधानाने दिलेले आरक्षणही राहील. आरक्षण संपविण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्याचा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी आठवले म्हणाले, सामाजिक दृष्ट्या भारतात सामंजस्य निर्माण झाल्यानंतर सामाजिक आरक्षण संपवण्याचा निर्णय काँग्रेस घेईल असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. या वक्तव्यातून राहुल गांधींनी काँग्रेस पक्ष आरक्षण विरोधी असल्याचेच उघड झाले आहे. आरक्षण संपविण्याची भाषा करण्याची राहुल गांधीना गरज काय होती ? परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे हे काँग्रेस नेते राहुल गांधींचे उद्योग आहेत. भारतात लोकतंत्र नाही असे परदेशात जाऊन बरळणे चुकीचे आहे. लोकतंत्र आणि आरक्षणबाबत परदेशात जाऊन चुकीची वक्तव्य करून देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधीचा आम्ही तीव्र निषेध करतो असे रामदास आठवले म्हणाले.
काँग्रेस सर्वाधिक काळ देशात सत्तेत होती. त्यांच्या काळात दलितांवर अधिक अत्याचार झाले आहेत. आजही दलितांवर अत्याचार होतात. त्यामुळे दलित आदिवासी मागासवर्गीयांना संविधानाने दिलेले आरक्षण हे त्यांचे कवच कुंडल आहे.असे आठवले म्हणाले. राहुल गांधी आणि मल्लिकाअर्जुन खरगे यांनी माफी मागावी. अशी बेफाम भाषा करून त्यांनी बाबासाहेबांचा आणि संविधानाचा तसेच दलीत समाजाचा अपमान केला आहे आणि त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे.अन्यथा आमच्या पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहोत.