Monday, August 25, 2025
घरमहाराष्ट्रकोण पटकविणार 'वाई स्वच्छता चषक'; २ सप्टेंबर ते दि.१५ ऑक्टोबर कालावधीत स्पर्धा-तीन...

कोण पटकविणार ‘वाई स्वच्छता चषक’; २ सप्टेंबर ते दि.१५ ऑक्टोबर कालावधीत स्पर्धा-तीन क्रमांकासाठी रोख रक्कम आणि सन्मान चषक

वाई -( प्रतिनिधी) : देशभरात स्वच्छतेचे महत्त्व ओळखून प्रत्येकजण स्वच्छ भारत मिशनसाठी आपापल्या परीने योगदान देत आहे. यात अधिक भर घालण्यासाठी वाई पंचायत समितीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये वाई स्वच्छता चषक स्पर्धा लावून लौकिक वाढविण्यासाठी महत्वपूर्ण उपक्रम दि.२ सप्टेंबर ते दि.१५ ऑक्टोबर पर्यंत आयोजित केला आहे. यात तीन क्रमांक काढून त्यांचा तालुकास्तरावर रोख रक्कम आणि सन्मान चषक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले.

देशपातळीवर लोकसहभागातून सर्वात प्रभावी पाणी व स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छ भारत मिशन हे अभियान अत्यंत यशस्वी होऊ लागले आहे. शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्यमान उंचविण्याकरिता वैयक्तिक शौचालय आणि ,सार्वजनिक शौचालयांचा वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन , मैलागाळ व्यवस्थापन , प्लॅस्टिक मुक्त गाव अशा विविध उपाययोजना शासनामार्फत राबविण्यात येतात . याच स्तुत्य उपक्रमाला अधिक लोकप्रिय करण्यासाठी संपूर्ण तालुक्यासाठी वाई पंचायत समितीने अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे.

तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत यात सहभागी होणार असून गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या संकल्पनेतील वाई स्वच्छता चषक स्पर्धेचा शुभारंभ वाई,खंडाळा, महाबळेश्वरचे लोकप्रिय आमदार मकरंद (आबा ) पाटील यांच्या हस्ते पंचायत समिती येथे करण्यात आला .

वाई स्वच्छता चषक स्पर्धे अंतर्गत विशेष स्वच्छता अभियान दि .२ सप्टेंबर ते १५ ऑक्टोंबर या कालावधी प्रति दिन नविन उपक्रम वेळापत्रकाप्रमाणे राबविण्यात येणार असून या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांचे पंचायत समिती वाई चे सहा .गटविकास अधिकारी बाळासो जाधव , उपअभियंता (ग्रा.पा.पु )सुनील मेटकरी ,तालुका आरोग्य अधिकारी यादव,गटशिक्षण अधिकारी वाळेकर , सर्व विभागाचे खाते प्रमुख , विस्तार अधिकारी , पर्यवेक्षिका ,शाखा अभियंता ,पाणी व स्वच्छता विभागाचे तालुका समन्वयक यांच्या मार्फत मूल्यांकन करण्यात येणार आहे .जास्त गुण प्राप्त करणाऱ्या तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना रोख रक्कम बक्षिस व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे . त्या करिता गावातील गणेशोत्सव मंडळे ,युवा मंडळातील युवक ,गावामधील तरुण मुले , मुली , महिला आणि ग्रामस्थांनी हे अभियान यशस्वीपणे राबविण्याकरिता उत्फुर्तपणे सहभाग घेणेबाबत गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी आवाहन केले आहे .

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments