ताज्या बातम्या

महाशिवरात्रीनिमित्त घोणसपूर येथील स्वयंभू श्री भैरी मल्लिकार्जुन देवाची यात्रा भक्तिभावात संपन्न होणार

घोणसपूर : महाशिवरात्रीनिमित्त घोणसपूर गावच्या स्वयंभू श्री भैरी मल्लिकार्जुन देवाची वार्षिक यात्रा रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही या यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविकांसह मुंबईतील चाकरमानी भक्त वर्षभर उत्सुकतेने वाट पाहत असतात.

अष्ट शिवालयांपैकी एक असणारे घोणसपूर येथील हे स्वयंभू शिवालय अत्यंत प्राचीन व महत्त्वपूर्ण मानले जाते. येथील शिवलिंग अतिशय दुर्मिळ असून या शिवलिंगावर बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन होत असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त असंख्य शिवभक्त यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

महाशिवरात्रीच्या पर्वकाळाच्या एक महिना आधीपासूनच सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन उत्सवाच्या तयारीला सुरुवात करतात. परंपरेनुसार देवाच्या मंदिरात गोंधळी यांना पाचारण करून महाशिवरात्रीपूर्वी देवाचा जागरण गोंधळ घालण्याची प्रथा आजही श्रद्धेने पाळली जाते.

महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून ग्रामस्थ मंदिरात एकत्र येतात. गणेशपूजन, रुद्राभिषेक, बिल्वार्चन व महाआरती करून उत्सवाला भक्तिमय प्रारंभ होतो. यानंतर मंदिर व परिसराची आकर्षक सजावट करण्यात येते. देवाची पालखी सजविणे, मंदिरावर पताका व तोरणे लावणे तसेच मंदिरासमोर देवाची गुढी उभारली जाते.

सायंकाळी मुख्य मकरंदगडावरून स्वयंभू देवाची रूपे वाजत-गाजत गावच्या मंदिरात आणली जातात. मंदिरात शिवलिंग, पार्वती, भैरी, जोगेश्वरी आदी देवतांची विविध फुलांनी व फळांनी मनोहर सजावट केली जाते. या वेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील विविध पालख्या देवदर्शनासाठी उत्सवात सहभागी होतात.

हातलोट ग्रामस्थ गावनय कुंबळजाई, चतुरबेट ग्रामस्थ देवीची तसेच दाभेमोहन येथील देवांच्या पालख्या मोठ्या उत्साहात घोणसपूर येथे दाखल होतात. पंचक्रोशीतील लहानथोर भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवतात.

सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात्रेकरूंचे स्वागत करून फराळ व प्रसादाची व्यवस्था केली जाते. भजन, आरती तसेच रात्री निशिथकालावेळी नामस्मरण करून भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी केली जाते.

दुसऱ्या दिवशी यात्रेकरूंकरिता महाप्रसादाची व्यवस्था ग्रामस्थ मोठ्या आस्थेने करतात. महाप्रसादानंतर सर्व पालख्या आलेल्या भक्तांना दर्शन देऊन निरोप घेतात. त्यानंतर भैरी मल्लिकार्जुन देवाची पालखी मंदिराची प्रदक्षिणा करून महाआरती केली जाते व यात्रेची भक्तिभावपूर्ण सांगता होते.

यंदाही हा भव्य आणि भक्तिमय उत्सव घोणसपूर ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक श्रद्धा व उत्साहात संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष रोशन बाबू जंगम यांनी दिली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top