बुलढाणा : कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. या घटनेचा निषेध केला जात असताना बदलापूर आणि अकोल्यातील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या. या संतापजनक घटनांमधील आरोपींना फाशी देण्याची मागणी होत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातदेखील सात चिमुकल्या विद्यार्थिनींवर वासनांध मास्तरने लैंगिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना समोर आली. या घटनेमुळे जिल्हाभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या शिक्षकाविरुद्ध पोस्को, अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये कार्यरत असलेला खुशाल शेषराव उगले याने आठ ते दहा वर्षे वयोगटातील मुलींसोबत हे काळे कृत्य केले. पवित्र शिक्षकी पेशाला त्याने कलंकीत केले. चौथ्या वर्गात शिकणाऱ्या काही मुलींना तो वर्गात जाऊन बोलावून घ्यायचा. त्यांच्याकडून हात पाय चेपून घ्यायचा. टीव्ही लावून वर्ग खोली बंद करून अश्लील चाळे
करायचा, नको त्या जागी बॅड टच’ करायचा. कुठलीही समज नसलेल्या या मुली घाबरून गप्प बसायच्या. मात्र, यातील मुलींना त्याचे हा घृणास्पद प्रकार सहन झाला नाही. त्यांनी पालकांना ही बाब सांगितली. पालकांनी गांभीर्याने न घेतल्याने त्याचा प्रताप वाढतच चालला होता. दरम्यान, काही सूज्ञ पालकांनी याची गंभीर दखल घेत चौकशी केली आणि संतापजनक घटना उघडकीस आली. पालकांनीमुलींना घेऊन थेट शाळा गाठून जाब विचारला. पालकांनी अॅड. प्रदीप सोनकांबळे तसेच ‘वंचित’ चे तालुकाध्यक्ष मधुकर शिंदे यांच्या कानावर ही बाब घातली. त्यांनी मुलींना घेऊन थेट किनगाव राजा पोलीस स्टेशन गाठले. याची माहिती ठाणेदार विनोद नरवाडे यांना दिली.त्यांनी घटनेची चौकशी सत्यता पडताळली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांना माहिती दिली. डीवाएसपी कदम यांनी गावात जावून मुलींची चौकशी केली. शाळेतही चौकशी करण्यात आली. तीन मुलींचा इनकॅमेरा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार विनोद नरवाडे, पोलीस कर्मचारी अब्दुल परसुवाले, खुशाल गीते, आशिष सवडे,
शिवाजी बारगजे, विष्णू मुंडे, झाकीर चौधरी यांनी आरोपीला अटक केली. घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी मनीषा कदम करीत आहेत. मुलींचा जबाब नोंदविला, त्यावेळी दक्षता समितीच्या प्रतिभा राजे जाधव, सुनीता राजुरे उपस्थित होत्या. सात मुलींसोबतच नव्हेतर जवळपास बारा मुली त्याच्या लैंगिक अत्याचाराला
बळी पडल्याचे काही पालकांचे
म्हणणे आहे.