
मुंबई (रमेश औताडे) : गेल्या २७ वर्षांपासून महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन, सांस्कृतिक, सामाजिक व अर्थकारणाच्या क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटनेने नवी मुंबईत एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व अधिवेशनाचे निमंत्रक प्रविणदादा गायकवाड यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गुरुवार २२ ऑगस्ट रोजी वाशी (नवी मुंबई) येथील विष्णुदास भावे नाट्यगृह या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे अधिवेशन पार पडणार आहे.
संभाजी ब्रिगेडच्या बदलाचा मागोवा व भविष्याचा वेध या विषयावर चार सत्रात विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनाचे उदघाटन आ. रोहित पवार, खा.अमोल कोल्हे, आ. शशिकांत शिंदे तसेच सिने अभिनेते सयाजो शिंदे, निखिल चव्हाण व गौरव मोरे आदि मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.
पहिल्या सत्रामध्ये पत्रकार अभिजीत करंडे हे “गोष्ट पैशापाण्याची” या पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची मुलाखत घेणार तर दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार हे “महाराष्ट्र धर्म काय शिकवतो?” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तिसऱ्या सत्रामध्ये निर्भिड पत्रकार निरंजन टकले हे “गांधीजीच्या स्वप्नातील भारत” या विषयावर संबोधित करणार तर लेखक चंद्रकांत झटाले या सत्रासाठी उपस्थित राहणार आहेत. चौथ्या सत्रामध्ये ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव हे “भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या विचारधारेची लोकशाही” या विषयावर आपले मनोगत व्यक्त करणार असून खा. भास्कर भगरे व सामाजिक कार्यकर्ते प्रदिप सोळुंके हे या सत्रामध्ये उपस्थित असणार आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार याच्या हस्ते व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विशेष उपस्थितीत कोल्हापूरचे नवनिर्वाचित लोकसभा खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा शाही सन्मान सोहळा पार पडणार आहे. अधिक माहिती, नावनोंदणी व संपर्कासाठो sambhajibrigade.org या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन निमंत्रक प्रविणदादा गायकवाड यांनी केले आहे. यावेळी मुंबई अध्यक्ष सागर भोसले सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.